कराड : येथील महिला महाविद्यालयाच्या कार्यालयातील रोख रक्कमेवर चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना घडली आहे. महाविद्यालयाचे ग्रिल कापून चोरट्यांनी सुमारे 9 हजार 710 रुपये चोरून नेले. महाविद्यालयातील चोरी व तोडफोडीच्या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी प्राचार्या डॉ. स्नेहल राजेंद्र प्रभुणे यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून अज्ञात चोरट्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, डॉ. स्नेहल प्रभुणे या महिला महाविद्यालयाच्या प्राचार्य आहेत. गुरुवारी 28 रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास महाविद्यालयातील काम आटोपून त्या घरी गेल्या. त्यावेळी शिपाई संदीप पवार हे शाळेत होते. त्यानंतर संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास संदीप पवार हेही महाविद्यालयाच्या ऑफिसला लॉक करून घरी गेले.
दरम्यान, शुक्रवारी 29 रोजी सकाळी स्नेहल प्रभुणे घरी असताना सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास संदीप पवार यांनी त्यांना फोन करून महाविद्यालयाच्या ऑफिसचे ग्रिल कोणीतरी कापले आहे, तुम्ही लवकर या, असे सांगितले. त्यामुळे त्या त्वरित महाविद्यालयात आल्या. त्यांनी घडलेली घटना पोलिसांना सांगितली. पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
त्यानंतर ऑफिसमध्ये जाऊन पाहिले असता त्यांना लाकडी टेबलचा ड्राव्हर उघडा दिसला. त्यामधील 110 रुपयांची रोख रक्कम चोरीस गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी महाविद्यालय परिसरात पाहणी केली असता इंग्रजी विभागामध्ये असणारी तीन लोखंडी कपाटांची तोडफोड करून त्यामधील 8 हजार रुपये चोरट्यांनी लंपास केले होते. तसेच वरील मजल्यावर असलेले एनएसएस विभागातील दोन लोखंडी कपाटाचीही चोरट्यांनी तोडफोड करून त्यातील 1600 रुपये चोरून नेले होते.
याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार देसाई करत आहेत.