मिळकत कर दुरुस्तीसाठी साताऱ्यात विशेष शिबिराचे आयोजन
हद्दवाढीतल्या नागरिकांना मिळणार दिलासा
सातारा नगरपरिषदेने हद्दवाढ भागातील मिळकत धारकांच्या मिळकत करांच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन केले आहे. याची माहिती वसुली विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. दि. 25 ऑक्टोबर ते सहा नोव्हेंबर यादरम्यान वेगवेगळ्या भागांमध्ये या शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
सातारा : सातारा नगरपरिषदेने हद्दवाढ भागातील मिळकत धारकांच्या मिळकत करांच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन केले आहे. याची माहिती वसुली विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. दि. 25 ऑक्टोबर ते सहा नोव्हेंबर यादरम्यान वेगवेगळ्या भागांमध्ये या शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
सातारा पालिकेने हद्दवाढीतील नागरिकांसाठी चतुर्थ वार्षिक पाहणीच्या आधारे अधीन राहून मिळकत कराची बिले पाठवली होती. सातारा शहर आणि हद्दवाढ क्षेत्रातील घरगुती व वाणिज्य अशा 60000 मिळतधारकांना ही बिले पाठवण्यात आली. मात्र चुकीच्या पद्धतीने मिळकत आकारणी झाल्याच्या नागरिकांनी तक्रारी केल्यामुळे खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुख्याधिकारी अभिजीत बापट यांना विशेष शिबिर आयोजित करण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार नागरिकांच्या तक्रारीचा निपटारा करण्यासाठी 25 ऑक्टोबर पासून विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. वसुली विभागाने दिलेल्या वेळापत्रकानुसार शाहूनगर भागासाठी दिनांक 25 ते 26 ऑक्टोबर रोजी विलासपूर कार्यालय कोडोली येथे सकाळी 11 ते 5 शिबिर होणार आहे. शाहूपुरी भागासाठी शाहूपुरी कार्यालय येथे दिनांक 27 ते 30 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 ते 5 कॅम्प होणार आहे. 31 ऑक्टोबर व 1 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 ते 5 विलासपूर भागासाठी विलासपूर ग्रामपंचायत कार्यालय येथे हा कॅम्प होणार आहे. दिनांक 2 व 3 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 ते 5 या वेळेत खेड भागासाठी कॅम्प कार्यालय सदर बाजार येथे हा कॅम्प होणार आहे. दिनांक सहा नोव्हेंबर रोजी सकाळी 11 ते 5 या वेळेत शाहू कला मंदिर येथे दरे भागासाठी विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे.
हद्दवाढ भागातील नागरिकांनी या तक्रार निवारण शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा आणि आपली बिले दुरुस्त करून तात्काळ त्याचा भरणा करावा, असे आवाहन पालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक अभिजीत बापट यांनी केले आहे.