maharashtra

जिल्हाधिकारी कार्यालय बनले पेपरलेस

ई-ऑफिस बनल्याची जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती

सातारा जिल्हाधिकारी कार्यालय पेपर मुक्त झाल्याची महत्त्वपूर्ण घोषणा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केली आहे.

सातारा : सातारा जिल्हाधिकारी कार्यालय पेपर मुक्त झाल्याची महत्त्वपूर्ण घोषणा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात ई ऑफिस प्रणाली कार्यान्वित झाली असून कार्यालयात दाखल होणाऱ्या टापालापासून ते फायलींपर्यंत सर्व कामे आता ऑनलाइन सुरू झाली आहे त्यामुळे कामांचा निपटारा जलद गतीने होणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयानंतर तालुक्याच्या ठिकाणी असलेली प्रांत व तहसील कार्यालय लवकरच ऑनलाईन होणार असून त्यांना 15 नोव्हेंबरची डेडलाईन देण्यात आली आहे. शासकीय कार्यालयामध्ये चालणारे चिरीमिरीच्या प्रकारांना पायबंद घालण्यासाठी ही ऑनलाईन योजना सुरू झाल्याची माहिती आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अतिरिक्त जिल्हाधिकारी, प्रांत, तहसीलदारांना त्यांचे अधिकार प्रदान केले होते. हा निर्णय घेताना जास्तीत जास्त अधिकार खालच्या अधिकाऱ्यांना प्रदान केले. लोकांची कामे वेळेत व्हावीत, त्यांना हेलपाटे मारायला लागू नयेत, गैरसोय होऊ नये, हा त्यामागचा हेतू होता.
डुडी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात ई-ऑफिस प्रणाली सुरू करण्याची जाहीर केले. मात्र एनआयसी चे स्थलांतर करावे लागल्याने या कामात थोडा विलंब झाला, पण ही प्रणाली तातडीने सुरू व्हावी यासाठी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला होता . जिल्हाधिकारी कार्यातील सर्व पत्रव्यवहार, फाईलच्या नोंदी ऑनलाईन होत आहेत. कुठल्या टेबलवर फाईल पेंडिंग आहे, हे सुद्धा ऑनलाईन आता समजणार आहे. नागरिकांना आपला अर्जही या ऑनलाइन सिस्टीम मुळे ट्रेक करता येणार असून नागरिकांना खेटे मारण्याची गरज उरणार नाही. नागरिकांच्या कामांचा निपटारा करण्याची सर्व जबाबदारी विभाग प्रमुखांवर राहणार असल्याचे डुडी यांनी सांगितले.
पहिल्या टप्प्यात जिल्हाधिकारी कार्यालय ई-ऑफिस बनले आहे. आता दुसऱ्या टप्प्यात तालुक्यांचे प्रांताधिकारी व तहसील कार्यालय, तालुका पुरवठा कार्यालय ही सुद्धा ऑनलाईन होणार आहेत. जिल्ह्यातील सर्व तहसीलदार व प्रांताधिकारी कार्यालयांमध्ये 15 नोव्हेंबर पर्यंत ई-ऑफिस प्रणाली कार्यान्वित होणार आहे. त्यासाठी संगणक, प्रिंटर, स्कॅनर इत्यादी साहित्य खरेदी करण्यात येत आहे. ऑनलाइन व्यवस्था निर्माण करण्यामागे प्रत्येक काम जलद गतीने व्हावे, नागरिकांची गैरसोय होऊ नये तसेच कामाच्या नावाखाली खाबूगिरी चा जो प्रकार बोकाळला आहे, त्याला या व्यवस्थेने पायबंद बसणार असल्याचे सांगितले जात आहे.