सातारा-मेढा रस्त्यावरील कोंडवे ता.सातारा गावच्या हद्दीत रस्त्यावर मंगळवारी पहाटे अज्ञात वाहनाने पायी चालत निघालेल्या (मॉर्निंग वॉक) दोन महिलांना ठोकरले. ही धडक एवढी भीषण होती की यातील एक वृध्द महिला जागीच ठार झाली.
सातारा : सातारा-मेढा रस्त्यावरील कोंडवे ता.सातारा गावच्या हद्दीत रस्त्यावर मंगळवारी पहाटे अज्ञात वाहनाने पायी चालत निघालेल्या (मॉर्निंग वॉक) दोन महिलांना ठोकरले. ही धडक एवढी भीषण होती की यातील एक वृध्द महिला जागीच ठार झाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला.
कमल रघुनाथ गोरे (वय ७१, रा. कोंडवे) असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. अपघातात कृष्णाबाई सुरेश चोरगे (वय ५८, रा.कोंडवे) असे जखमी झालेल्या दुसर्या महिलेचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, ही घटना साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. दोन्ही महिला दररोज पहाटे चालायला मेढा रस्त्यावरुन जात. मंगळवारीही नेहमीप्रमाणे त्या दोघी निघाल्या होत्या. मात्र अज्ञात वाहनाने त्यांना ठोकरले. या घटनेत कमल गोरे यांना गंभीर दुखापत झाली व त्यातच त्यांचा मृत्यू झाला. कृष्णाबाई चोरगे या जखमी झाल्या. अपघाताच्या व ओरडण्याच्या आवाजाने परिसर हादरुन गेला. मात्र परिसरात तुरळक लोकवस्ती असल्याने व अंधार असल्याने अज्ञात वाहनावरील चालकाने वाहन न थांबवता तेथून तो तसाच पसार झाला.