यशवंतराव चव्हाण नितीमुल्ये जपणारे मानवतेचे मंदिर
प्राचार्य डाँ. यशवंत पाटणे : नव्या पिढीने त्यांच्या जीवनचरित्रातून प्रेरणा घ्यावी
समाजाचे मन वाचण्याचे आणि समाज मन चेतवण्याचे शाब्दिक सामर्थ्य आणि वैचारिक ऐश्वर्य त्यांच्या ठायी होते. यशवंतराव हे नितीमुल्ये जपणारे मानवतेचे मंदिर असून नव्या पिढीने जाणतेपणाने त्यांच्या जीवनचरित्रातून सत्कर्माची प्रेरणा घेतली पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डाँ. यशवंत पाटणे यांनी केले.
कराड : दिवंगत यशवंतराव चव्हाण हे सुसंस्कृत, प्रतिभासंपन्न आणि प्रगल्भ विचारसरणीचे नेते होते. समाजाच्या विविध घटकांमध्ये प्रेम, विश्वास आणि सामंजस्य निर्माण करण्याचे संघटन कौशल्य त्यांच्या नेतृत्वात होते. समाजाचे मन वाचण्याचे आणि समाज मन चेतवण्याचे शाब्दिक सामर्थ्य आणि वैचारिक ऐश्वर्य त्यांच्या ठायी होते. यशवंतराव हे नितीमुल्ये जपणारे मानवतेचे मंदिर असून नव्या पिढीने जाणतेपणाने त्यांच्या जीवनचरित्रातून सत्कर्माची प्रेरणा घेतली पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डाँ. यशवंत पाटणे यांनी केले.
येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात त्यांच्या 109 व्या जयंतीनिमित्त कराड पंचायत समितीने आयोजित केलेल्या व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी संन्मती देशमाने यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. पाटणे म्हणाले, यशवंतराव चव्हाण यांच्या बुद्धिनिष्ठा, नितीनिष्ठा, ध्येयनिष्ठा, देशनिष्ठा आणि मातृनिष्ठा जीवनाच्या पंचनिष्ठा होत्या. सामान्य माणूस आणि लोकशाही मूल्ये हा त्यांच्या विचार कार्यप्रणालीचा केंद्रबिंदू होता. यशवंतराव हे समाजासाठी सदैव आदरणीय आणि राज्यकर्त्यांसाठी अनुकरणीय नेते आहेत. त्यांनी लोकशाहीची बूज राखण्यासाठी आपल्या विचाराचे निष्ठावान अनुयायी तयार केले. सत्ता हे सामाजिक परिवर्तनाचे आणि प्रगतीची साधन आहे, हे ओळखून कृषी, औद्योगिक योजना, पंचायत राज, सत्तेचे विकेंद्रीकरण, साहित्य संस्कृती मंडळ, विश्वकोश, भाषा संचालनालय, मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा, आर्थिक दृष्ट्या मागास विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक शुल्क सवलत अशा अनेक योजना राबवून त्यांनी सामाजिक न्यायाचा मानदंड निर्माण केला.