पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस 17 सप्टेंबर व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती 2 ऑक्टोबर या काळात संपूर्ण देशामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने सेवा पंधरवडा साजरा करण्यात येणार असून सातारा जिल्ह्यामध्ये याची सुरुवात फलटण पासून करणार असल्याचे माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले.
फलटण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस 17 सप्टेंबर व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती 2 ऑक्टोबर या काळात संपूर्ण देशामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने सेवा पंधरवडा साजरा करण्यात येणार असून सातारा जिल्ह्यामध्ये याची सुरुवात फलटण पासून करणार असल्याचे माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले.
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्रातील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात सेवा पंधरावडा साजरा केला जाणार असून सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा याचे मोठ्या स्वरूपात नियोजन केले जात आहे. भाजपा सातारा जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे व माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार यांनी नुकतीच फलटण तालुका व शहर भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यामध्ये पदाधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. ही माहिती देताना खासदार रणजीतसिंह बोलत होते यावेळी भाजपा सातारा जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे, सरचिटणीस जयकुमार शिंदे, फलटण तालुका अध्यक्ष बजरंग गावडे, शहराध्यक्ष अमोल सस्ते, पश्चिम महाराष्ट्र युवा मोर्चाचे सह संपर्कप्रमुख सुशांत निंबाळकर, भाजपा माळशिरस तालुका अध्यक्ष बाजीराव काटकर, फलटण तालुका महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ. उषा राऊत यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.
भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांनी या सेवा पंधरावड्याबाबत माहिती देताना सांगितले की, या सेवा पंधरवड्यामध्ये जिल्हा व मंडल स्तरावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर प्रदर्शन आयोजित केले जाणार असून, जनकल्याणकारी योजना व प्रशासकीय कार्यकौशल्य विषयी पुस्तकांचे स्टॉल लावण्यात येणार आहेत. भाजपा युवा मोर्चाच्यावतीने प्रत्येक जिल्ह्यात रक्तदान व विनामूल्य आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांगासाठी कृत्रिम अवयव व उपकरणे याचे वितरण, तसेच मोदी सरकारने २०२५ पर्यंत संपूर्ण भारत क्षयरोगमुक्त करण्याचा संकल्प केला असून त्या दृष्टीने टीबी रोगाने ग्रासलेल्या व्यक्तीला प्रत्येक मंडल स्तरावर दत्तक घेऊन त्याचे पालन पोषण, रोजगार व औषध उपचाराची सेवा लोकसभागातून केली जाणार आहे. तसेच कोरोनाची लस देण्यासंदर्भात लसीकरण केंद्रांचे स्टॉल ठिकठिकाणी लावण्यात येणार असून, वृक्षारोपण आणि स्वच्छता अभियान राबवली जाणार आहे. जल हेच जीवन याची प्रत्येक मंडळातील घरोघरी जाऊन जल संरक्षणाचे उपाय सांगितले जाणार असून, एक भारत श्रेष्ठ भारत हा संदेश समाजापर्यंत पोहोचविला जाणार आहे. आत्मनिर्भर भारताच्या यशाची कामे व्होकल फोर लोकलच्या माध्यमातून संपूर्ण समाजापर्यंत पोहोचवली जाणार असून जिल्ह्यातील बुद्धिजीवी व्यक्तींची निवड करून त्यांचे संमेलन भरविले जाणार आहे. अशा प्रकारे हा सेवा पंधरवडा साजरा केला जाणार असून याची माहिती समाजातील सर्व घटकापर्यंत पोहोचवली जाणार आहे असे आ. गोरे यांनी सांगितले.
जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे यांनी प्रास्ताविकात बैठकीचे स्वरूप सांगितले. हा सेवा पंधरवडा यशस्वी करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या सर्व आघाड्या व मोर्चाचे पदाधिकारी आणि सभासद यांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.