पाळीव प्राण्यांनी रस्त्यावर घाण केल्यास मालकाला होणार 500 रूपये दंड
कराड नगरपालिकेची नोटीस जारी : सार्वजनिक हितासाठी मुख्याधिकारी रमाकांत डाके यांचा निर्णय
येथील नगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षण 2022 व माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत विविध उपक्रम हाती घेतले आहेत. त्याअंतर्गत रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी घाण करणाऱ्या पाळीव प्राण्यांच्या मालकांना नगरपालिकेकडून 500 रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे. यासाठी पालिकेकडून विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे.
कराड : येथील नगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षण 2022 व माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत विविध उपक्रम हाती घेतले आहेत. त्याअंतर्गत रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी घाण करणाऱ्या पाळीव प्राण्यांच्या मालकांना नगरपालिकेकडून 500 रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे. यासाठी पालिकेकडून विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे.
कराड नगरपालिकेच्या हद्दीत राहणारे कुत्रे, घोडे, मांजर, गाढव, म्हैस या पाळीव प्राणी मालकांनी स्वतः पाळीव प्राण्यांची विष्ठा गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्यात यावी. अन्यथा, कचरा व्यवस्थापन नियम 2016 नूसार सबंधित प्राण्यांची घाण केलेली रस्त्यावर आढळ्यास प्राणी मालकाला जागेवरच 500 रूपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. अशी जाहिर नोटीसही पालिकेकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे.
शहरातील रस्त्यावर, मोकळ्या जागेत, उद्यानांमध्ये अशा पाळीव प्राण्यांची घाण उघडपणे आढळल्यास संबंधित पाळीव प्राणी मालकास जागेवरच 500 रुपये दंड आकारला जाईल. अशा स्वरूपाची अधिसूचना सार्वजनिक हितासाठी मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी जारी केली आहे.
सार्वजनिक ठिकाणे, रस्ते किंवा फूटपाथवर अनेकजण किंवा 'केअर टेकर' हे आपल्या घरातील कुत्र्यांना घेऊन फिरायला येतात. पण यावेळी अनेकदा रस्त्यावर, फूटपाथवर किंवा सार्वजनिक ठिकाणी हे प्राणी विष्ठा करतात. त्यामुळे अस्वच्छता होऊन आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. हे लक्षात घेऊन नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाने याबाबत विशेष जनजागृती मोहिम सुरु केली आहे.
येथील प्रीतिसंगम बाग परिसर, कृष्णा घाट, छ. शिवाजी स्टेडिअम, शिवाजी हौसिंग सोसायटीतील रस्ते, टाऊन हॉल, पी. डी. पाटील उद्यान, दैत्यनिवारणी व जूना कोयना पूल येथे पाळीव प्राण्यांसह फिरायला येणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. विशेष म्हणजे कुत्र्यांमुळे सार्वजनिक ठिकाणी घाण होत असल्याच्या तक्रारी नगरपरिषदेकडे आल्या होत्या. त्यामुळे नगरपरिषदेकडून विशेष जनजागृती मोहीम सुरु करण्यात येणार आहे.