कॅफेत अश्लील चाळेप्रकरणी साताऱ्यात चौघांवर गुन्हा
सातारा : अजंठा चौकातील एका हॉटेललगतच्या कॅफेत दोन अल्पवयीन युवतींसमवेत अश्लील चाळे सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर सातारा शहर पोलिसांनी काल त्याठिकाणी कारवाई केली. कारवाईदरम्यान पोलिसांनी त्याठिकाणाहून दोन युवतींसह दोघांना ताब्यात घेतले. याप्रकरणी युवक आणि कॅफेचालकासह चौघांवर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दरम्यान, त्या कॅफेची तोडफोड केल्याप्रकरणी रिपाइंच्या पूजा बनसोडेंवर देखील गुन्हा नोंदविण्यात आला आहे
गेल्या काही वर्षांत सातारा शहर आणि परिसरात कॅफे संस्कृती फोफावली असून, त्याठिकाणी युवक- युवती गैरप्रकार करत असल्याच्या तक्रारी होत्या. याच अनुषंगाने शाहूपुरी पोलिसांत दाखल झालेल्या अत्याचार प्रकरणात कॅफेचा उल्लेख समोर आल्याने पोलिसांनी अशा कॅफेंचा शोध सुरू केला होता. अजंठा चौकातील एका हॉटेलच्या पाठीमागील बाजूस हिडन नावाचा कॅफे असून,
त्याठिकाणी दोन अल्पवयीन युवती दोन युवकांसमवेत थांबल्याची माहिती सातारा पोलिसांना मिळाली. याचदरम्यान त्याठिकाणी जाऊन रिपाइंच्या काही पदाधिकाऱ्यांनी आंदोलन करत तोडफोड केली. तोडफोड सुरू असतानाच सातारा शहर पोलिसांचे पथक त्याठिकाणी पोचले व त्यांनी कॅफेत असणाऱ्या युवती व सोबतच्या दोन युवकांना ताब्यात घेतले.
याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्याच्या उपनिरीक्षिका चांदणी शरद मोटे यांनी तक्रार नोंदवली आहे. यानुसार युवतीसोबत असणाऱ्या प्रकाश केदारी कागिलकर (वय २१, रा. नागेवाडी, ता. सातारा), शुभम विष्णू शिंदे (वय २४, रा. किन्हई, ता. कोरेगाव) या दोघांवर, तसेच कॅफेचालक विक्रम नंदकिशोर निकम (वय २२, रा. शिवाजी चौक, पुसेगाव) आणि आशुतोष हिंदुराव माने (रा. जुनी एमआयडीसी, धनगरवाडी, सातारा) यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याचा तपास उपनिरीक्षक वाघमोडे हे करीत आहेत. दरम्यान, कॅफेची तोडफोड केल्याप्रकरणी कॅफेचालक विक्रम निकम यानेही सातारा शहर पोलिस ठाण्यात रात्री तक्रार नोंदवली आहे. यानुसार रिपाइंच्या पूजा बनसोडेंवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याचा तपास हवालदार दगडे हे करीत आहेत.