साताऱ्यातील मोती चौकातील समाधान वॉचचे मालक व सातारा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे चेअरमन शरदराव शंकरराव चव्हाण उर्फ काका ( वय 94) यांचे सोमवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले.
सातारा : साताऱ्यातील मोती चौकातील समाधान वॉचचे मालक व सातारा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे चेअरमन शरदराव शंकरराव चव्हाण उर्फ काका ( वय 94) यांचे सोमवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. येथील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांच्या पश्चात तीन मुले व तीन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. साताऱ्याचे माजी उपनगराध्यक्ष जयेंद्र चव्हाण यांचे ते वडिल होत. शरदराव चव्हाण उर्फ काका यांनी आपल्या उमेदीच्या काळात प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत व्यवसायाचा उत्तम जम बसविला. सातारा नगरीचे नगरसेवक ते उपनगराध्यक्ष अशी विविध पदेही त्यांनी जवाबदारीने पार पाडली. सातारा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जडणघडणीत काका अखंड पाच दशके सक्रीय राहिले. काकांनी चेअरमनपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर संस्थेच्या विस्तारीकरणासह कला वाणिज्य महाविद्यालयाची प्रगती वेगाने झाली. एक कसबी पैलवान म्हणून काकांची साताऱ्याच्या पंचक्रोशीत ख्याती होती. अनेक पैलवानांना त्यांनी मदतही केली होती.
सोमवारी दुपारी माहुली येथील कैलास स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सातारा मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने शरदराव चव्हाण यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. साताऱ्याच्या विविध क्षेत्रातील मान्यवरांनी काकांच्या अंत्यदर्शनासाठी प्रतापगंज पेठ येथील निवासस्थानी उपस्थिती दर्शविली.