देशाचे प्रधानमंत्री हे आदरणीय व्यक्तिमत्व आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या वक्तव्याचा भाजपने विपर्यास केला. खरेतर, पटोले यांनी पंतप्रधानांचे नाव वापरलेले नाही. केवळ त्यांना बदनाम करण्यासाठी भाजपने अर्थाचा अनर्थ केला असून त्यांची जनमाणसातील प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न राज्यातील भाजप करत आहे.
कराड : देशाचे प्रधानमंत्री हे आदरणीय व्यक्तिमत्व आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या वक्तव्याचा भाजपने विपर्यास केला. खरेतर, पटोले यांनी पंतप्रधानांचे नाव वापरलेले नाही. केवळ त्यांना बदनाम करण्यासाठी भाजपने अर्थाचा अनर्थ केला असून त्यांची जनमाणसातील प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न राज्यातील भाजप करत आहे. यासाठी प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागातर्फे भाजपचे माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांच्या विरोधात राज्यभर गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती काँग्रेसचे ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी दिली.
येथील शासकीय विश्रामगृहात बुधवारी १९ रोजी दुपारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भानुदास माळी म्हणाले, ओबीसींचे आरक्षण हे भाजपने संपवले आहे. त्यांच्याच पक्षातील राम कदम आणि आशीश शेलार यांनी महिलांच्या बाबतीत काय वक्तव्ये केलीत. यातून भाजपची संस्कृती दिसून येते. त्यांनी देशाची संपती विकायला काढली असून ते देशही विकतील अशी स्थिती आहे. भांडवलदारांचे १५ लाख कोटी रुपयांचे कर्ज केंद्र सरकारने माफ केले आहे. शेतकरी, गरीबांना द्यायला पैसे नाहीत. याकडे दुर्लक्ष व्हावे, यासाठी भाजपने हा मुद्दा उपस्थित केला आहे. त्याचा कॉंग्रेस ओबीसी विभागाच्या वतीने आम्ही तीव्र निषेध करतो.
त्याचबरोबर भाजपच्या अनिल बोंडे यांनी नाना पटोले यांच्या विरोधात भयानक स्टेटमेंट केले असून आधी त्यांनी स्वतःची लायकी काय ते पहावे, असा टोला लगावत त्यांच्या विरोधात राज्यातील सर्व पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करुन त्यांच्या अटकेची मागणी करत असल्याचेही माळी यांनी यावेळी सांगितले. तसेच ओबीसी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले भाजपाला भारी पडत असल्यानेच त्यांच्या पायाखालील जमीन सरकली आहे. त्यामुळे बोंडे यांनी तोंड न आवरावे. अन्यथा, आम्हीही त्यांना जशास तसे उत्तर देऊ, असेही माळी यांनी बजावले आहे.
तसेच आज आलेल्या नगरपंचायत निवडणूक निकालांमध्ये काय परिस्थिती आहे, हे भाजपने बघावे. राज्यभरात अनेक ठिकाणी कॉंग्रेस व मित्र पक्षांना चांगले यश मिळाले आहे. त्याचाही राग भाजपच्या नेत्यांना असल्याने त्यांच्याकडून अशी विधाने केली जात असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.