maharashtra

पहाटेच्या शपथविधी विषयी अजितदादा पवार आणि शरद पवार सांगू शकतात

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार यांची साताऱ्यात जोरदार फटकेबाजी

सरकार म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र असतो. कोणतेही सरकार 40 लोकांसाठी चालवले जात नाही, तर ते 13 कोटी महाराष्ट्रासाठी चालवलं पाहिजे, हे सत्तेतल्या लोकांनी समजून घ्यावे, असा मार्मिक टोला त्यांनी सध्याच्या शिंदेशाही सरकारला लगावला.

सातारा : अडीच वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या महाविकास आघाडीच्या बांधणीपूर्वी पहाटेचा जो शपथविधी झाला त्यावेळी काय घडलं हे माजी केंद्रीय मंत्री राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे दोघेच सांगू शकतात. त्या दोघांनाच याविषयी माहिती आहे. ते या शपथविधी विषयी काही बोलत नाहीत. त्यामुळे आपण उगाच राजकीय अंदाज बांधून वक्तव्य करणे चुकीचे आहे, अशी मार्मिक शैलीतली फटकेबाजी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमदार रोहित पवार यांनी केली.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आमदार रोहित पवार प्रथमच सातारा जिल्हा दौऱ्यावर आले होते. त्यांनी नायगाव, तालुका खंडाळा या सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावी भेट दिली आणि साताऱ्यात येऊन पत्रकारांशी येथील सातारा क्लब मध्ये मनमोकळा संवाद साधला.
यावेळी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन कार्यकारणी सदस्य एडवोकेट कमलेश पिसाळ, निशांत गवळी, राष्ट्रवादीचे सरचिटणीस राजकुमार पाटील इत्यादी त्यांचे सहकारी उपस्थित होते.
रोहित पवार पुढे म्हणाले, सरकार म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र असतो. कोणतेही सरकार 40 लोकांसाठी चालवले जात नाही, तर ते 13 कोटी महाराष्ट्रासाठी चालवलं पाहिजे, हे सत्तेतल्या लोकांनी समजून घ्यावे, असा मार्मिक टोला त्यांनी सध्याच्या शिंदेशाही सरकारला लगावला. ते पुढे म्हणाले, राजकीय भूकंप करण्याची क्षमता जनतेमध्ये आहे. त्यामुळे यापुढे ज्या विधानसभा लोकसभा निवडणुका होतील त्यामध्ये लोकच त्यांच्या इच्छेने राजकीय भूकंप घडवून आणतील. जे लोक महाराष्ट्र बाहेर जाऊन सत्ता बदल करतात, त्यांच्यातील असंतुष्टांमुळेच कदाचित झाला तर भूकंप होऊ शकतो, असेही खोचक विधान त्यांनी केले. विरोधातील लोक सत्तेत आणि सत्तेचे लोक विरोधातही जाऊ शकतील अशी शक्यता त्यांनी वर्तवली.
पहाटेच्या शपथविधी ही शरद पवारांची खेळी होती व त्याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसचा झाला, असे जयंत पाटील म्हणाल्याचे निदर्शनास आणून दिल्यावर रोहित पवार म्हणाले, जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे काम चांगले सुरू आहे. ते जे बोलत असतात त्याचे अनेक संदर्भ आहेत. पहाटेच्या शपथविधी वेळी काय घडलं हे शरद पवारांनी अजित पवार यांनाच माहीत आहे. याविषयीचे काही बोलत नाही. मात्र त्यानंतर काय झाले हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे. त्यामुळे उगाच पवारांवर टीका करणाऱ्या राजकीय नेत्यांनी पवार फॅमिली वरून राजकीय पतंगबाजी करू नये. ज्यांना शरद पवार कळलेच नाहीत अशांनी तर अजिबातच विधान करू नये, असेही ते म्हणाले.
शक्ति कायद्यावरून त्यांनी नितेश राणे यांच्यावर निशाणा साधला. सरकारला महिला अधिकाऱ्यांना ताकद द्यायची नाही. युवकांची आणि महिलांचे प्रश्न मांडण्याऐवजी व सोडवण्याऐवजी टेबल टेनिस प्रमाणे नको त्या प्रश्नांचे चेंडू इकडून तिकडे करायचे आहेत. त्यामुळे त्यांनी याविषयी पतंगबाजी करू नये. महाराष्ट्र क्रिकेट मध्ये ग्रामीण भागातील खेळाडूंचा समावेश असून महिला क्रिकेटमध्ये ही ग्रामीण भागातील मुली व मुले पुढे जात आहेत. त्यामुळे सातारा जिल्ह्यामध्ये लेदर बॉल चे क्रिकेट लॉन लवकरच निर्माण केले जाणार आहे. सातारा जिल्ह्यातील गुणवंत खेळाडूंना पारदर्शी पद्धतीने गुणवत्तेनुसार निश्चितच संधी दिली जाईल, असेही पवार यांनी स्पष्ट केले.
पार्थ पवार यांच्या नाराजीवर पुन्हा बोलताना रोहित पवार म्हणाले, पार्थ हा माझा भाऊ आहे. आम्ही वेळोवेळी चर्चा करत असतो. जे कोण बोलत आहेत त्यांना अजून पवार कळाले नाहीत. तसेच त्यांना त्यांचाच मतदारसंघ कळालेला नाही. त्यामुळे पवारही त्यांच्यासाठी फार लांबची गोष्ट आहे. बारामतीचा मतदारसंघ त्यांच्यासाठी असेल तर त्यांना शुभेच्छा आहेत.