पुसेगाव येथील सेवानिवृत्त शिक्षकाची सुमारे साडेपाच लाख रुपयांची फसवणूक
एटीएम कार्डचा नंबर मागून गंडा ; अज्ञातावर गुन्हा
तुमचे नवीन एटीएम कार्ड आले आहे, जुन्या एटीएम कार्डचा नंबर सांगा असेच म्हणत अज्ञात इसमाने पुसेगाव, ता. खटाव येथील एका सेवानिवृत्त शिक्षकाची सुमारे साडेपाच लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार पुसेगाव पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
सातारा : तुमचे नवीन एटीएम कार्ड आले आहे, जुन्या एटीएम कार्डचा नंबर सांगा असेच म्हणत अज्ञात इसमाने पुसेगाव, ता. खटाव येथील एका सेवानिवृत्त शिक्षकाची सुमारे साडेपाच लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार पुसेगाव पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पुसेगाव, ता. खटाव येथे जनार्दन कृष्णाजी मुळे, वय ८० हे सेवानिवृत्त शिक्षक वास्तव्य करतात. दि. १४ ऑक्टोंबर रोजी ७.३० ते ८.४० वाजण्याच्या सुमारास त्यांच्या मोबाइलवर अज्ञात इसमाने फोन करून तुमचे नवीन एटीएम कार्ड आले आहे असे सांगितले. तुमच्या जुन्या एटीएम कार्डचा नंबर सांगा, आम्ही नवीन एटीएम कार्ड घरी आणून देतो असे त्यांनी सांगितल्यानंतर जनार्दन मुळे यांनी त्याला जुन्या एटीएम कार्डचा नंबर सांगितला असता अनोळखी इसमाने इलेक्ट्रिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांच्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकेच्या खात्यातून ५ लाख ५0 हजार रुपये काढले. जनार्दन मुळे यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी संबंधित अनोळखी इसमाविरोधात पुसेगाव पोलीस ठाण्यात फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली आहे.