maharashtra

पाचवड फाट्याजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन ठार


Two killed in Pachwad fork collision
कराड तालुक्यात पुणे-बेंगलोर आशियायी महामार्गावर पाचवड फाट्याजवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत सातारा येथील दोन युवक जागीच ठार झाले. गुरुवारी 10 रोजी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.

कराड : कराड तालुक्यात पुणे-बेंगलोर आशियायी महामार्गावर पाचवड फाट्याजवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत सातारा येथील दोन युवक जागीच ठार झाले. गुरुवारी 10 रोजी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.
इम्रान मुनीर पठाण (वय 42) व सरफराज आझाद शेख ऊर्फ राजू (वय 39) दोघे रा. गुरुवार पेठ, सदरबझार, सातारा अशी अपघातात ठार झालेल्या युवकांची नावे आहेत.
याबाबत घटनास्थळासह पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, सातारा येथील दोघेजण कामानिमित्त गुरुवारी दुचाकी (क्रमांक एम.एच.11 बी.टी. 2801) वरून इस्लामपूरला गेले होते. तेथील काम आटोपून रात्री १० वाजण्याच्या सुमारास ते परत सातार्‍याकडे निघाले होते. पुणे-बंगळूर महामार्गावर रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास ते पाचवड फाट्याजवळ आले असता कोल्हापूरकडून सातार्‍याकडे जाणार्‍या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीसह दोघे महामार्गावर पडल्याने त्यांच्या डोक्याला जोरात मार लागला. त्यामुळे जास्त रक्तस्त्राव झाल्याने ते जागीच ठार झाले.
या अपघाताची माहिती मिळताच महामार्ग देखभाल विभागाचे कर्मचारी ए.पी. भालेराव, संजय माने यांच्यासह कर्मचारी, पोलीस हवालदार खलील इनामदार, प्रशांत जाधव व महामार्ग पोलिस कर्मचरी तातडीने अपघातस्थळी दाखल झाले. दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रूग्णालयात पाठवून देण्यात आले. अपघाताची नोंद कराड शहर पोलीस ठाण्यात झाली आहे.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच नातेवाईकांनी कराड उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली. आज शुक्रवार दि 11 रोजी सातारा येथील सदरबजार दफनभूमी आणि गेंडामाळ कब्रस्थान याठिकाणी अंत्यविधी पार पडले
अन्वर पठाण यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील असा परिवार आहे, तर राजू आझाद शेख यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई- वडील असा परिवार आहे.