maharashtra

सातारा जिल्ह्यातील काही पोलीस अधिकाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार : आ. नितेश राणे

राज्यात लवकरच धर्मांतर विरोधी कायदा होणार

सातारा जिल्ह्यातील काही पोलीस अधिकाऱ्यांचा आम्ही करेक्ट कार्यक्रम करणार आहोत, असा इशारा भाजपाचे आ. नितेश राणे यांनी दिला. दरम्यान, राज्यात लवकरच धर्मांतर विरोधी कायदा करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

सातारा : लव्ह जिहाद, धर्मांतर यासारख्या घटनांकडे सातारा जिल्ह्यातील काही अधिकारी दुर्लक्ष करत हिंदू विरोधी भूमिका घेत आहेत. अशा अधिकाऱ्यांची यादी तयार करण्यात आली असून ती लवकरच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपविण्यात येणार आहे. सातारा जिल्ह्यातील काही पोलीस अधिकाऱ्यांचा आम्ही करेक्ट कार्यक्रम करणार आहोत, असा इशारा भाजपाचे आ. नितेश राणे यांनी दिला. दरम्यान, राज्यात लवकरच धर्मांतर विरोधी कायदा करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

पाटण, ता. पाटण येथे हिंदू आक्रोश मोर्चाला उपस्थित राहिल्यानंतर त्यांनी सातारा येथील विश्रामगृहामध्ये प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला. ते पुढे म्हणाले, पाटण तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला. अत्याचार करणाऱ्या प्रवृत्तींचा विरोध करण्यासाठी पाटण येथे हिंदू आक्रोश मोर्चा काढण्यात आला. ज्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला ती मुलगी व तिचे कुटुंबीय प्रचंड दहशतीखाली आहे. आम्ही तिची व तिच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यांना धीर दिला. त्या मुलीला शाळेत जाण्यासाठी अथवा घराबाहेर पडण्यासाठी भीती वाटतेय. आज आम्ही मोर्चा काढला असला तरी उद्या आपल्याला धमक्या तर मिळणार नाहीत ना अशी भीती पीडित मुलीच्या कुटुंबीयांना वाटत आहे. मात्र सध्या राज्यात शिंदे आणि फडणवीस यांचे सरकार आहे हिंदुनी अजिबात घाबरण्याचे कारण नाही. जिथे- जिथे ताकत लागेल तिथे तिथे आम्ही ती नक्की देऊ.

आ. नितेश राणे पुढे म्हणाले, श्रद्धा वालकर हिची हत्या करून तिचे ३५ तुकडे करण्यात आले होते. असे प्रकार महाराष्ट्रात सर्रास घडत आहेत मात्र ते होऊ नये याची काळजी घेणे गरजेचे आहे. अशा प्रकारच्या प्रवृत्तीच्या व्यक्ती निदर्शनास आल्यास त्यांच्यावर पोलिसांनी कडक कारवाई करण्याची गरज आहे. दुर्दैवाने काही पोलीस अधिकारी हिंदूंवरील अत्याचार थांबवत नाहीत. त्यामुळे जिहादी मानसिकता मोठ्या प्रमाणे वाढू लागली आहे. सातारा जिल्ह्यात सातारा, फलटण, पाचगणी, आणि महाबळेश्वर येथील काही पोलीस अधिकाऱ्यांची यादी तयार केली असून ती यादी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देऊन संबंधित पोलीस अधिकाऱ्यांचा आम्ही करेक्ट कार्यक्रम करणार आहोत, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. लव्ह जिहादच्या नावाखाली हिंदू मुलींना लक्ष केले जात आहे. त्यामुळे लव्ह जिहाद, धर्मांतरबंदी कायदा महाराष्ट्रात लवकरच आणण्याबाबत शिंदे फडणवीस सरकार विचार करीत आहे. त्यावर अभ्यासही सुरू असून कदाचित हा कायदा हिवाळी अधिवेशनामध्येही मांडला जाण्याची शक्यता आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. राज्यामध्ये कॅथोलिक समाजातील लोक धर्मांतर करण्यासाठी पुढाकार घेतात. वेळप्रसंगी संबंधित युवकाला तू अँथनी बनू नको अमर म्हणूनच रहा, असा सल्ला त्यांना दिला जात आहे. हा प्रकार नवी मुंबई नजीकच्या पालघर आणि कोकणपट्टयात सुरू आहे, असेही त्यांनी यावेळी नमूद केले. धर्मांतर विरोधी कायदा पारित झाल्यानंतर जो पॉक्सो कायदा करू शकला नाही ते काम धर्मांतर विरोधी कायदा निश्चित करेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

आ. रोहित पवार मध्येमध्ये तोंड घालतो

दोनच दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. रोहित पवार यांनी महिलांच्या संरक्षणार्थ करण्यात येत असलेल्या  शक्ती कायदा संदर्भात वक्तव्य केले होते. ही बाब नितेश राणे यांच्या निदर्शनास आणून देताच ते म्हणाले, राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार असताना आ. रोहित पवार हेही सत्तेत होते. तेव्हाच कायदा पारित झाला असता तर त्यांचेच काही मंत्री आज आत बसले असते. रोहित पवार मध्येमध्ये तोंड घालतो. त्यापेक्षा त्याने कर्जत, जामखेड इकडे लक्ष द्यावे.