साताऱ्यात राजधानी सातारा किल्ला स्पर्धांचे आयोजन
येसूबाई फाउंडेशन व जिज्ञासा मंचचा संयुक्त उपक्रम
सातारा शहरातील सुप्रसिद्ध येसूबाई फाउंडेशन व जिज्ञासा मंच यांच्या संयुक्त उपक्रमाने दिवाळीनिमित्त सामूहिक आणि वैयक्तिक अशा दोन गटांमध्ये राजधानी सातारा किल्ला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
सातारा : सातारा शहरातील सुप्रसिद्ध येसूबाई फाउंडेशन व जिज्ञासा मंच यांच्या संयुक्त उपक्रमाने दिवाळीनिमित्त सामूहिक आणि वैयक्तिक अशा दोन गटांमध्ये राजधानी सातारा किल्ला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. मोबाईल संस्कृतीतून बाहेर पडून आजच्या मुलांना मातीत रमण्याची मातीतून कलाकृती साकारण्याची त्याचबरोबर गडकोटांचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात यावे यासाठी या स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती फाउंडेशनचे संस्थापक सुहास राजेशिर्के यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
प्रसिद्धी पत्रकात पुढे नमूद आहे की, शिवकाळामध्ये स्वराज्य निर्मितीत किल्ल्यांना अनन्यसाधारण महत्त्व होते. किल्ल्यांच्या संरचनांमध्ये अनेक विविधता आढळून येते. डोंगरी किल्ले, भुईकोट किल्ले, सागरी किल्ले अशा माध्यमातून वेगवेगळ्या ऐतिहासिक बांधकामाच्या संरचना या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात आहेत. हा ऐतिहासिक वारसा पुढील पिढीला अवगत व्हावा तसेच दिवाळीत मुलांना मातीत रमण्याचे आणि मातीतून कलाकृती साकारण्याचे ज्ञान अवगत व्हावे यासाठी राजधानी सातारा किल्ला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनासाठी सक्रिय असलेल्या येसूबाई फाउंडेशन व जिज्ञासा मंच यांच्या संयुक्त उपक्रमाने हा स्पर्धांचा कार्यक्रम होणार आहे.
सामूहिक आणि वैयक्तिक पातळीवर या स्पर्धा होणार असून यामध्ये जास्तीत जास्त मुलांनी सहभागी व्हावे, असे आवाहन येसूबाई फाउंडेशनचे संस्थापक माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के व जिज्ञासा विकास मंचचे निलेश पंडित यांनी केले आहे. या स्पर्धांसाठी प्रवेशमूल्य शंभर रुपये ठेवण्यात आले आहे. या किल्ल्यांचे परीक्षण दिनांक 10 ते 15 नोव्हेंबर या दरम्यान केले जाणार आहे. या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी सुहास राजेशिर्के 9545777746 व निलेश पंडित 9762016618 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा, असे संयोजकांनी कळवले आहे.