मुंबईच्या सोने व्यापार्याला म्हसवड परिसरात लुटले
सुमारे 20 लाखांचे सोने घेवून चोरट्यांचा पोबारा
मुंबईचे व्यापारी सोने खरेदी करुन अकलुज येथील त्यांच्या पेढीत निघाले असता म्हसवड नजिक दोन दुचाकींवरुन आलेल्या लुटारुंनी त्यांना पिस्तुलाच्या धाकाने लुटले. या लुटमारीत सुमारे 20 लाखांचे सोने लुटून चोरट्यांनी पोबारा केला आहे.
म्हसवड : मुंबईचे व्यापारी सोने खरेदी करुन अकलुज येथील त्यांच्या पेढीत निघाले असता म्हसवड नजिक दोन दुचाकींवरुन आलेल्या लुटारुंनी त्यांना पिस्तुलाच्या धाकाने लुटले. या लुटमारीत सुमारे 20 लाखांचे सोने लुटून चोरट्यांनी पोबारा केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मुंबई येथील व्यापारी सुरेश इफ्ताराम कुमावत हे सोने खरेदी करुन त्यांच्या अकलुज येथील पेढीकडे निघाले होते. सांयकाळी साडेपाचच्या सुमारास म्हसवडवरून ते माळशिरस रोडने अकलूजला निघाले. त्याचवेळी गाडेकर वस्तीजवळ दोन दुचाकींवरून आलेल्या चौघांनी कारसमोर दुचाकी आडव्या घातल्या. या दुचाकीस्वारांनी कुमावत यांची गाडी थांबवली. गाडी थांबताच एकाने त्याच्याजवळील पिस्तुल काढले. या सर्वांनी दमदाटी करून कुमावत यांच्याजवळील 15 ते 20 लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने लुटून पोबारा केला.
या घटनेची माहिती म्हसवड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक बाजीराव ढेकळे यांना मिळाल्यानंतर त्यांच्यासह इतर पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तपास सुरू केला. काल रात्री उशिरापर्यंत माळशिरस परिसरात त्या चोरट्यांचा शोध सुरू होता. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती.