संभाजी चव्हाण यांच्या मृत्यूचा तपास एलसीबीकडून
पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया : जिल्हा पत्रकार संघाने दिले निवेदन, सखोल तपास करण्याची केली मागणी
पत्रकार संभाजी चव्हाण यांनी विष प्राशन केल्याचे प्रकरण गंभीर आहे. पोलीस प्रशासनाने जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनाची दखल घेतली असून संभाजीच्या मृत्यूचा तपास गुन्हा दाखल करुन स्थानिक गुन्हे शाखेकडून केली जाईल, असे आश्वासन पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया यांनी दिले.
सातारा : पत्रकार संभाजी चव्हाण यांनी विष प्राशन केल्याचे प्रकरण गंभीर आहे. पोलीस प्रशासनाने जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनाची दखल घेतली असून संभाजीच्या मृत्यूचा तपास गुन्हा दाखल करुन स्थानिक गुन्हे शाखेकडून केली जाईल, असे आश्वासन पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया यांनी दिले.
सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे यांच्या नेतृत्वाखाली व खासदार उदयनराजे भोसले यांच्या समवेत संघाच्या वतीने जलमंदिर येथे हे निवेदन देण्यात आले. यावेळी सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख, सुनिल काटकर, संघाचे सरचिटणीस दीपक प्रभावळकर, पुणे विभाग राज्य उपाध्यक्ष शरद काटकर, शहराध्यक्ष विनोद कुलकर्णी, प्रसिद्धी प्रमुख दीपक शिंदे, ज्येष्ठ पत्रकार जीवनधर चव्हाण, डिजीटल मीडिया पत्रकार परिषद जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे, जिल्हा सचिव पद्माकर सोळवंडे, प्रशांत जगताप, प्रतिक भद्रे, गुरुनाथ जाधव, अमोल निकम, प्रमोद इंगळे, शुभम गुजर, तबरेज बागवान तसेच नागठाणे भाग पत्रकार संघाचे अध्यक्ष विकास जाधव, उपाध्यक्ष दत्ता घाडगे, सचिव सत्यनारायण शेडगे, ज्येष्ठ पत्रकार सतीश जाधव, शंकर कदम, धनाजी कणसे, विजय घोरपडे, दत्ता क्षीरसागर आदी उपस्थित होते.
महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया यांना निवेदन देताना जिल्हाध्यक्ष हरिष पाटणे म्हणाले, पत्रकार संभाजी चव्हाण हे निर्भिड पत्रकार होते. त्यांनी भरतगाववाडीसह नागठाणे परिसरातील अनेक समस्या तडीस लावल्या. त्यांचा स्वभाव हा आत्महत्या करण्यासारखा नव्हता. विष प्राशन करण्याची त्यांच्यावर लादलेली अनिवार्यता होती. त्यांना इतके टोकाचे पाऊल उचलण्यामागे त्यांचा झालेला मानसिक छळ असल्याचे त्यांच्या कुटुंबियांकडून व मित्र परिवाराकडून समजले. त्यामुळे पत्रकार संभाजी चव्हाण यांची आत्महत्या नाही तर त्यांना आत्महत्येला प्रवृत्त केल्याचे हे प्रकरण आहे.
यामध्ये स्थानिक लोक व यंत्रणांचा सहभाग असल्याचीही चर्चा असल्यामुळे या प्रकरणी तातडीने गुन्हा दाखल करुन याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून करणे आवश्यक आहे.
सातारा जिल्हा पत्रकार संघ जिल्हय़ातील प्रत्येक पत्रकाराच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. यापुढेही कोणाला मानसिक त्रास अथवा कोण ससेमिरा लावत असेल तर त्यांनी आपल्या कुटुंबियांशी, मित्र परिवाराशी व मातृसंस्था म्हणून जिल्हा पत्रकार संघाशी संवाद साधावा. पत्रकारांवरील अन्याय कोणत्याच पातळीवर सहन केला जाणार नाही. अशा प्रवृत्तींना ठेचून काढण्यासाठी जिल्हय़ातील पत्रकार एकसंघ असल्याचे हरिष पाटणे यावेळी म्हणाले.
संभाजी चव्हाण यांच्या कुटुंबाच्या पाठीशी आम्ही खंबीर आहोत
संभाजी चव्हाण हे केवळ पत्रकार नव्हते तर ते खऱया अर्थाने सामाजिक कार्यकर्ते होते. सातारा तालुक्याच्या ग्रामीण विकासात संभाजी चव्हाण यांचे कार्य विसरता येणार नाही. सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रातही त्यांचे मोठे योगदान आहे. ते भरतगावचे उपसरपंच असले तरी त्यांनी आपल्या गावाबरोबर पंचक्रोशीच्या विकासाचा कायम विचार केला होता. त्यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. संभाजी चव्हाण यांच्यावर ही वेळ आणणाऱया कोणालाच सोडणार नाही. कायद्याच्या अधीन राहून संबधितांना कडक शासन करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत. तसेच संभाजी चव्हाण यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी आम्ही खंबीर आहोत.
- खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले
कुटुंबियांच्या निवेदनात आहेत गंभीर आरोप
खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या सांगण्यावरुन संभाजी चव्हाण यांच्या कुटुंबियांनी महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया यांना निवेदन सादर केले. या निवेदनात कुटुंबियांच्यावतीने गंभीर आरोप करण्यात आले आहेत. तसेच संभाजी यांना आलेले मेसेज व काही भक्कम पुरावे पोलीस प्रशासनाला देण्यात आले आहेत. निवेदन सादर करताना संभाजी चव्हाण यांचे चिरंजीव वैभव चव्हाण, जय चव्हाण, बंधू प्रशांत चव्हाण उपस्थित होते.