जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकास न्यायालयाने साडेतीन वर्ष कैद तसेच दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
सातारा : जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकास न्यायालयाने साडेतीन वर्ष कैद तसेच दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 5 मे 2019 रोजी सायंकाळी राजेंद्र महादेव वाघमारे वय 48, राहणार कुशी, नागेवाडी, तालुका सातारा हा त्याच गावातील आनंदराव विठोबा साळुंखे वय ७८ यांच्या घरासमोर अशोक बाजीराव साळुंखे यांस दगड मारत होता. त्यावेळी आनंदराव साळुंखे यांनी वाघमारे यास तू दगड का मारतोस, अशी विचारणा केली आणि ते आपल्या घरी गेल्यानंतर वाघमारे याने आनंदराव साळुंखे यांच्या घरात घुसून साळुंखे यांना शिवीगाळ व धमकी देत त्याच्या जवळील लोखंडी सळईने साळुंखे यांच्या मनगटावर, डाव्या पायावर व खुब्यावर गंभीर मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक डी.ए. दळवी यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र पाठवले होते.
हा खटला चौथे जिल्हा सत्र न्यायाधीश एस. जी. नंदीमठ यांच्या कोर्टात चालला होता. सरकारतर्फे जिल्हा सरकारी अभियोक्ता म्हणून श्रीमती पुष्पा जाधव यांनी अत्यंत कौशल्याने या खटल्याचे कामकाज पाहिले. या खटल्यामध्ये एकूण 11 साक्षीदार तपासण्यात आले. केवळ परिस्थितीजन्य पुरावा व अन्य साक्षीदारांच्या साक्षीवरून न्या. नंदीमठ यांनी राजेंद्र महादेव वाघमारे यास कलम 326 अन्वये साडेतीन वर्ष साधी कैद आणि पाचशे रुपये दंड, दंड न दिल्यास दहा दिवस साधी कैद तसेच कलम 452 अन्वये अडीच वर्षे साधी कैद व पाचशे रुपये दंड, दंड न दिल्यास दहा दिवस साधी कैद अशी शिक्षा ठोठावली आहे.
या खटल्यात सातारा विभागाच्या पोलीस उपविभागीय अधिकारी श्रीमती आंचल दलाल, सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली पैरवी अधिकारी म्हणून महिला पोलीस नाईक एस.पी. वाघ यांनी परिश्रम घेतले.