'तू आता लग्न कर नाहीतर तुला सोडतच नाही,' असे म्हणून फलटण येथील एका युवकाने सातारा येथील करंजे पेठेत राहणाऱ्या एका वीस वर्षीय युवतीचे अपहरण केल्याची घटना सातारा शहर परिसरात घडली आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : 'तू आता लग्न कर नाहीतर तुला सोडतच नाही,' असे म्हणून फलटण येथील एका युवकाने सातारा येथील करंजे पेठेत राहणाऱ्या एका वीस वर्षीय युवतीचे अपहरण केल्याची घटना सातारा शहर परिसरात घडली आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल झाला आहे.
प्रतीक संतोष गायकवाड असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव असून रात्री उशिरापर्यंत त्याला अटक करण्यात आलेली नव्हती. दरम्यान, प्रतिक हा संबंधित युवतीला जबरदस्तीने दुचाकीवरुन डी मार्ट परिसरात घेवून आल्यानंतर ती युवती दुचाकीवरुन खाली पडल्याने जखमी झाली आहे.
याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यातून देण्यात आलेली अधिक माहिती अशी की, सातारा शहरालगत असणाऱ्या करंजे पेठेत राहणाऱ्या एका वीस वर्षीय युवतीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, गुरुवार, दि. ६ रोजी सकाळी सव्वाअकरा वाजण्याच्या सुमारास संबंधित युवती धनंजय गाडगीळ कॉलेजसमोर उभी असताना तेथे प्रतीक संतोष गायकवाड (रा. उमाजी नाईक चौक, फलटण, जि. सातारा) हा दुचाकीवरुन आला आणि त्याने युवतीला दुचाकीवर बसवले. यानंतर प्रतीक याने युवतीला 'तू आता लग्न कर नाहीतर तुला सोडतच नाही,' असे म्हणून जबरदस्तीने दुचाकीवरुन पोवई नाका, वाढेफाटा मार्गे पुणे बंगळूरु राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या डी मार्टसमोर आणले. येथे संबंधित युवती दुचाकीवरुन खाली पाय टेकवत असताना दुचाकी तशीच पुढे गेली. यात युवती खाली पडली. यात तिच्या हात, पायाला व डोक्याला गंभीर मार लागला. यात युवती जखमी झाली आहे.
दरम्यान, या प्रकारानंतर संबंधित युवतीने सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर प्रतीक संतोष गायकवाड याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक जगताप करत आहेत.