कोरोना काळात आपल्या सर्वांना एकत्रित येता येत नव्हते. याकाळातच अंगणवाडी पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी अतिशय चांगले काम केले त्यामुळे आपण त्यांचा सन्मान करीत आहोत. तसेच कोरोना काळात जिल्हा कोरोनामुक्ती करण्यास अंगणवाडी सेविकांचे काम प्रशंसनीय असल्याचे प्रतिपादन सहकार, पणन तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.
सातारा : कोरोना काळात आपल्या सर्वांना एकत्रित येता येत नव्हते. याकाळातच अंगणवाडी पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी अतिशय चांगले काम केले त्यामुळे आपण त्यांचा सन्मान करीत आहोत. तसेच कोरोना काळात जिल्हा कोरोनामुक्ती करण्यास अंगणवाडी सेविकांचे काम प्रशंसनीय असल्याचे प्रतिपादन सहकार, पणन तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.
सातारा जिल्हा परिषद, महिला व बालविकास विभाग, एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांच्या आदर्श अंगणवाडी पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा सन 2019-20 व 2020-2021 पुरस्कार वितरण सोहळा श्री. पाटील यांच्या हस्ते स्व. यशवंतराव चव्हाण बहुद्देशीय सभागृह जिल्हा परिषद येथे संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते, महिला व बाल कल्याण समिती सभापती सौ. सोनाली पोळ, अर्थ शिक्षण व क्रीडा समिती सभापती मानसिंगराव जगदाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा आदी उपस्थित होते.
पाटील म्हणाले, अंगणवाडी सेविकांना गावातील प्रत्येक कुटुंबाची इत्यंभूत माहिती असते गावातील बाळांना व गरोदर मातांना स्वच्छतेबाबत, बालकांच्या पोषण व आरोग्याविषयक सुधारणा घडवून आणण्यासाठी मदत करीत असतात. बालकांच्या योग्य शारिरीक, मानसिक व सामाजिक विकासाचा पाया घालण्याचे काम या सेविका करीत असतात.
कोरोना काळात व इतर काळातही सेविकांचे काम चांगले होते. म्हणून आज आपण त्यांचा सन्मान करीत आहोत. ज्यांना आज पुरस्कार मिळाले त्यांचे अभिनंदन व ज्यांना पुरस्कार मिळाले नाहीत त्यांनी या सेविकांचे आदर्श घेऊन चांगले काम करावे. सातारा जिल्हा परिषद नेहमीच विविध अभियानात चांगले काम करीत असल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले.
यावेळी खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले, अंगणवाडी सेविका या सावित्रीच्या लेकी असून कोरोना काळात यांनी खरी समाजसेवा केली आहे. पोषण आहारातही जिल्ह्यात चांगले काम झाले आहे. अंगणवाडी सेविकांनी चांगले काम करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी तुमचा गुणगौरव सोहळा करीत आहोत.
यावेळी विनय गौडा म्हणाले, अंगणवाडी सेविका गावातील महत्त्वाचा घटक आहे. गरोदर माता व बालक यांचे पोषण व आरोग्य विषयक काम करीत असतात. कोरोना काळातही या सेविकांनी उल्लेखनीय काम केले आहे.
यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, महिला व बाल विकास अधिकारी रोहिणी ढवळे, अंगणवाडी पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका व मदतनीस आणि त्यांचे नातेवाईक आदि उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते एकूण 108 आदर्श अंगणवाडी पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा सन 2019-20 व 2020-2021 पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला तसेच कोव्हिड-19 संबंधित कर्तव्य बजावताना मृत्यु झालेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या वारसांना विमा कवच सानुग्रह सहायय अनुदान रक्क्म रुपये 50 लक्ष धनादेशाचे वितरण करण्यात आले.