K. Chandrashekar Rao KCR at Vitthal Mandir : यांचा 600 गाड्यांचा ताफा पंढरपूरबाहेर अडवला; काय कारण?
पंढरपूर : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव सध्या पंढरपूरमध्ये आहेत. तेलंगणाचं अख्खं मंत्रिमंडळ घेऊन के.सी. राव आज पंढरपुरात आहेत. पंढरपूरमधील विठ्ठल मंदिरात जात केसीआर यांनी दर्शन घेतलं. तर रूक्मिणी मातेचंही त्यांनी दर्शन घेतलं आहे. यावेळी 10 दहा तेलंगणाचे मंत्री त्यांच्यासोबत होते. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे. केसीआर यांच्यासोबत सहाशे गाड्यांचा ताफा होता. मात्र हा ताफा पंढरपूरबाहेरच अडवण्यात आला.
केसीआर यांनी 10 मंत्र्यांसोबत विठ्ठल-रूक्मिणीचं दर्शन घेतलं. यावेळी केसीआर यांचे समर्थक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
600 गाड्यांचा ताफा अडवला
केसीआर 600 गाड्यांच्या ताफ्यासह महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. पंढरपुरातही केसीआर आपल्या ताफ्यासह येत होते. मात्र पंढरपूरबाहेरच त्यांचा ताफा अडण्यात आला. आषाढी एकादशीमुळे अनेक भाविक पंढरपूरमध्ये आले आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव केसीआर यांना 600 गाड्यांचा ताफा न्यायला परवानगी नाकारण्यात आली.
पुष्पवृष्टीला नकार
के. चंद्रशेखर राव यांनी पंढरपुरात वारकऱ्यांवर मंदीर परिसरात हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्याची परवानगी मागितली होती. पण सुरक्षेच्या कारणास्तव या पुष्पवृष्टीला परवानगी नाकारण्यात आली.
मोठा पोलीस बंदोबस्त
केसीआर यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात विठ्ठल मंदिराच्या व्हीआयपी गेटवर महाराष्ट्र पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. केसीआर यांच्या सुरक्षेची जबाबदारी महाराष्ट्र पोलिसांकडून चोख पद्धतीने करण्यात येत आहे. बीडीडीएस पथकानंही मंदीर परिसराची तपासणी केली आहे.सुरक्षेत कोणतीही चूक होणार नाही याची खबरदारी महाराष्ट्र पोलिसांकडून घेतली जात आहे.
थोड्यात वेळात सरकोलीकडे रवाना
केसीआर यांनी पंढरपूरात विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं. त्यानंतर केसीआर थोड्यात वेळात सरकोली गावाकडे रवाना होणार आहेत. तिथे BRS चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यात भगिरथ भालके BRS पक्षात प्रवेश करणार आहेत.
दर्शनानंतर केसीआर शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. शेतकऱ्यांसाठी विविध घोषणा केल्या आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलताना दिसतात. आताही विठ्ठल रूक्मिणीचं दर्शन घेतल्यानंतर केसीआर शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
भगिरथ भालके यांच्या पक्ष प्रवेशानंतर केसीआर तुळजापूरला दर्शनासाठी जाणार आहेत. पण त्याआधी बीआरएस आणि तुळजाभवानी मंदीर संस्थान यांच्यात प्रवेशद्वार बंद करण्यावरून वाद पेटला आहे.
मुख्यमंत्री केसीआर तुळजाभवानी दर्शनाला येणार असल्याने मंदीर 3 ते सायंकाळी 6 या वेळेत भक्तांसाठी बंद असणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव निर्णय घेतल्याचं मंदीर संस्थानने सांगितलं आहे. यावरून वाद निर्माण झाला आहे.