मेडिकल कॉलेजचे साहित्य चोरणाऱ्या भंगारवाल्या दुकानदारांवर कारवाई करा
राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस रमेश उबाळे यांचे मेडिकल कॉलेज समोर उपोषण
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश चिटणीस व प्रसिद्ध व्यावसायिक रमेश उबाळे यांनी कृष्णा नगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रस्तावित इमारती समोर गुरुवारपासून आमरण उपोषण सुरू केले आहे.
सातारा : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश चिटणीस व प्रसिद्ध व्यावसायिक रमेश उबाळे यांनी कृष्णा नगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रस्तावित इमारती समोर गुरुवारपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. शासकीय मेडिकल कॉलेज मधील साहित्य चोरणाऱ्या भंगारवाले दुकानदार आणि संबंधित अधिकारी यांच्यावर दरोड्याचा गुन्हा दाखल न केल्यामुळे आपण आमरण उपोषण सुरू केल्याचे उबाळे यांनी कळवले होते. त्यानुसार त्यांनी आपल्या निवडक सहकाऱ्यांसह कॉलेज समोर ठिया दिला आहे.
पोलीस अधीक्षक समीर शेख यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की, सातारा मेडिकल कॉलेजचे काम सुरू झाले असले तरी साफसफाई च्या नावावर मेडिकल कॉलेजच्या जागेत असणाऱ्या दोनशे छोट्या-मोठ्या इमारती पाडण्याची निविदा न काढता त्या जागेवरील लोखंड विटा, मुरूम, लाकडे, प्लास्टिक इत्यादी साहित्य चोरीला गेले आहे. सातारा शहरातील भंगारवाले आणि भंगारवाड्यांनी काही लोकप्रतिनिधींच्या बगलबच्चांना सोबत घेऊन 17 लाख रुपये देऊन इमारती विकत घेतल्या. भंगारवाल्यांनी येथील सर्व साहित्य दरोडा टाकून चोरून नेले आहे. यासंदर्भात कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याने करोडो रुपयांच्या झालेल्या चोरी बाबत कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवलेली नाही.
शासनस्तरावर कोणत्याही प्रकारची निविदा या संदर्भात काढली गेली नाही. भंगारवाले, जलसंपदा विभागाचे अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधींचे बगलबच्चे यांनी संगणमताने हा गैरव्यवहार केल्याचा आरोप उबाळे यांनी केला आहे. या प्रकाराची पोलिसांनी नि:ष्पक्ष चौकशी करून काय ते सत्य बाहेर आणावे आणि जबाबदार भंगारवाले आणि अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी उबाळे यांनी केली आहे. जोपर्यंत ही प्रक्रिया होत नाही तोपर्यंत हे उपोषण बेमुदत असेच सुरू राहणार असल्याचे त्यांनी पुढे पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.