ॲड. सदावर्तेंना चार दिवसांची पोलीस कोठडी
न्या. शेडगे यांच्यासमोर झाली सुनावणी; पुणे पोलीसही अटक करण्याची शक्यता
वादग्रस्त विधिज्ञ गुणरत्न सदावर्ते यांना सातारा पोलिसांनी मुंबई येथून अटक केले होते. दरम्यान, शुक्रवारी सकाळी सातारा पोलिसांनी त्यांना सातारा जिल्हा व सत्र न्यायालयात न्या. शेडगे यांच्यासमोर हजर केले असता दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने सदावर्तेंना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे सदावर्तेंचा साताऱ्यातील मुक्काम वाढला आहे.
सातारा : वादग्रस्त विधिज्ञ गुणरत्न सदावर्ते यांना सातारा पोलिसांनी मुंबई येथून अटक केले होते. दरम्यान, शुक्रवारी सकाळी सातारा पोलिसांनी त्यांना सातारा जिल्हा व सत्र न्यायालयात न्या. शेडगे यांच्यासमोर हजर केले असता दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने सदावर्तेंना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे सदावर्तेंचा साताऱ्यातील मुक्काम वाढला आहे.
मुंबई येथे खासदार शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानावरील हल्ल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी ॲड. सदावर्ते यांना अटक केली होती. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असलेले छत्रपती उदयनराजे भोसले, कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांच्याबाबत दोन वर्षांपूर्वी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात 2020 मध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. ऑक्टोबर 2020 मध्ये सदावर्तेंना सातारा पोलिसांनी चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावली होती. मात्र, ते हजर झाले नव्हते.
त्यानंतर मुंबई पोलिसांनी त्यांना अटक केल्यानंतर सातारा पोलिसांनी या दोन वर्षांपूर्वी दाखल असलेल्या गुन्ह्यात सदावर्तेंना ताब्यात देण्यासाठी गिरगाव न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यावर न्यायालयाने ऑर्थर रोड कारागृहाला सदावर्तेंना सातारा पोलिसांच्या ताब्यात देण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार गुरुवारी सातारा पोलिसांनी ऑर्थर रोड कारागृहातून सदावर्तेंना ताब्यात घेतले होते. काल संध्याकाळी उशिरा सदावर्तेंना सातारा शहर पोलीस ठाण्यात आणल्यानंतर अटक करण्यात आली.
त्यानंतर सदावर्तेंना सातारा जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी साताऱ्यातील सहावे प्रथम न्यायदंडाधिकारी एस. एस. शेडगे यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी दोन्ही पक्षांनी जोरदार युक्तीवाद केला. युक्तीवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायाधीशांनी युक्तीवादाचे अवलोकन करुन ॲड. सदावर्ते यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्यामुळे सदावर्तेंचा साताऱ्यातील मुक्काम चार दिवसांनी वाढला आहे.
साताऱ्यानंतर आता पुणे पोलिसही गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्याची शक्यता
सातारा : वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. गुणरत्न सदावर्ते यांना सातारा जिल्हा न्यायालयाने 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सातारा पोलिसानंतर पुढे पुणे पोलिसही गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्याची शक्यता आहे. पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात 9 सप्टेंबर 2020 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात पुणे पोलीस त्यांना अटक करण्याची शक्यता आहे.
दरम्यान, पुण्यातील कात्रज परिसरात राहणारे अमर रामचंद्र पवार (वय 35) यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात तक्रार दिली आहे. अमर पवार हे बांधकाम व्यावसायिक असून मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक म्हणून काम पाहतात. सदावर्ते यांनी 7 ऑक्टोबर 2020 रोजी एका वृत्तवाहिनीवर बोलत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज खासदार संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी ही तक्रार देण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा वंशजांचा एकेरी उल्लेख करुन सकल मराठा समाजाचा अपमान होईल व जाती-पाती मधे तेढ निर्माण होऊन दंगल भडकेल अशा प्रकारचे शब्द वापरल्यामुळे गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात तक्रार देण्यात आली आहे. त्यामुळे पुणे पोलीसही या गुन्ह्यात सदावर्ते यांना अटक करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.