चरेगाव, ता.कराड गावच्या हद्दीत अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी ठार झाल्याची घटना मंगळवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.
उंब्रज : चरेगाव, ता.कराड गावच्या हद्दीत अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी ठार झाल्याची घटना मंगळवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. दरम्यान, हा अपघात रात्रीच्या सुमारास झाला असून धडक दिलेल्या वाहनधारकाने सदर व्यक्तीस उचलून रस्ताकडेला ठेवले असावे अशी चर्चा घटनास्थळी होती. उंब्रज पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी कराड येथे उपजिल्हा रुग्णालयात पाठवला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, चरेगाव, ता कराड येथे सोमवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास मागासवर्गीय वस्तीमधील आनंदा बापू कांबळे हे नेहमीप्रमाणे रात्री जेवणानंतर शतपावली करण्यासाठी पवार मळा रोड येथे गेले होते. त्यादरम्यान अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला. सकाळी फिरायला गेलेल्या ग्रामस्थांच्या लक्षात हा प्रकार आला. दरम्यान, अपघात झाल्याचे लक्षात येताच अज्ञाताने मृतदेह रस्त्याच्या ओघळीत ओढून लावल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे. सदर अपघाताची माहिती मिळताच उंब्रज पोलीसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय कराड येथे पाठवला आहे. या घटनेचा उंब्रज पोलिस तपास करीत आहेत.