सातारा शहराची हद्दवाढ झाली आहे. शाहुनगर,विलासपूर, गोडोली हा संपूर्ण भाग शहर हद्दीत समाविष्ट झाला आहे. येथील रहिवासी नागरीकांच्या सोयीसाठी गोडोली येथे स्वतंत्र नवीन तलाठी सजा व कार्यालय निर्माण करावे, अशी मागणी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सातारचे जिल्हाधिकारीशेखर सिंह यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
सातारा : सातारा शहराची हद्दवाढ झाली आहे. शाहुनगर,विलासपूर, गोडोली हा संपूर्ण भाग शहर हद्दीत समाविष्ट झाला आहे. येथील रहिवासी नागरीकांच्या सोयीसाठी गोडोली येथे स्वतंत्र नवीन तलाठी सजा व कार्यालय निर्माण करावे, अशी मागणी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सातारचे जिल्हाधिकारीशेखर सिंह यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
शाहूनगरचा संपूर्ण भाग शहर हद्दीत आला आहे. विलासपूर ही संपूर्ण तत्कालीन ग्रामपंचायत आणि गोडोलीचा पूर्वी हद्दी बाहेर असलेला संपूर्ण भाग शहर हद्दीत समाविष्ट करण्यात आला आहे. सदरचा बहुतांशी संपूर्ण भाग रहिवासी असल्याने, येथील लोकसंख्या सुमारे 40 हजारांच्या आसपास आहे. येथील नागरीकांना त्यांच्या मुलांच्या शैक्षणिक कारणासाठी उत्पन्नाचा दाखला, क्रीमिलेअर, रहिवास इत्यादी दाखल्यांसाठी आणि व्यक्तीगत कारणासाठी 7/12 उतार्यासह, तलाठी कार्यालयातील नमुना नंबर 1 ते 21 पैकी कोणत्याही दाखला, उतार्यासाठी सातारा शहर तलाठी यांचेकडे राजवाडा येथे जावे लागत आहे.वृध्द नागरीक, शालेय विदयार्थी, महिला भगीनींना असे दाखले मिळवण्यासाठी मोठे परिश्रम घ्यावे लागत आहेत. ऑनलाईनचा जमाना असला तरी सर्वांनाच ते जमते असे नाही. शासकीय वेबसाईटवर काहीवेळा कोणतेच दाखले मिळत नाहीत. वेळेवर दाखले मिळवणे ही फार मोठी चिंतेची बाब ठरत आहे.
त्यामुळे या भागातील लोकसंख्येचा विचार करता, या भागातील रहिवाशांच्या सोयी सुविधेसाठी, नागरीकांचा वेळ आणि श्रम वाचवण्यासाठी गोडोली येथे गोडोली सजासह, विलासपूर आणि शाहूनगर याभागाकरीता स्वतंत्र तलाठी कार्यालय कार्यान्वित करावे अशी आग्रही मागणी नागरीकांच्या वतीने खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देताना केली.
आपल्या मागणीप्रमाणे गोडोली येथे नवीन शाहुनगर, विलासपूर, गोडोली असा नवीन तलाठी सजा निर्माण करुन, गोडोली येथे तलाठी कार्यालय सुरु करणेबाबत सकारात्मक कार्यवाही विनाविलंब केली जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना दिले.
निवेदन देताना रॉबर्ट मोझेस, ऍड.डि.जी.बनकर, सातारचे उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, यांच्यासह बहुसंख्य नागरीक, कार्यकर्ते उपस्थित होते.