maharashtra

कॉंग्रेसच्या 'त्या' सात आमदारांनी पैसे घेऊन भाजपला मतदान केलं : पृथ्वीराज चव्हाण


राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे दिग्गज नेते गुलाम नबी आझाद यांनी सोनिया गांधींना पाच पानी पत्र लिहून पक्षाचा राजीनामा दिला असतानाच, आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्रातील निवडणुकीबाबत मोठा गौप्यस्फोट केलाय.

कराड : राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे दिग्गज नेते गुलाम नबी आझाद यांनी सोनिया गांधींना पाच पानी पत्र लिहून पक्षाचा राजीनामा दिला असतानाच, आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्रातील निवडणुकीबाबत मोठा गौप्यस्फोट केलाय.
विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 20 जून रोजी निवडणूक झाली होती. या निवडणुकीत भाजपनं आपल्या संख्याबळाहून एक अधिकची जागा निवडून आणली होती. तर, काँग्रेसच्या पहिल्या क्रमांकाच्या उमेदवाराला पराभवाचा धक्का बसला होता. त्यावेळी काँग्रेसच्या 11 आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याची माहिती समोर आली होती.
आता या प्रकरणावर पृथ्वीराज चव्हाणांनी मोठा गौप्यस्फोट केलाय. या निवडणुकीत काँग्रेसच्या सात आमदारांनी पैसे घेऊन भाजपला मतदान केलं होतं, असं धक्कादायक विधान चव्हाण यांनी केलंय. चंद्रकांत हंडोरे या आमच्या सहकाऱ्यावर अन्याय झाला होता. या प्रकरणी मी कारवाईची मागणी केली होती. ज्यांनी क्रॉस व्होटिंग केलं, त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी मी पक्षश्रेष्ठींकडं केली होती.
या निवडणुकीत आर्थिक व्यवहार झाले आहेत. यावर पक्षाकडून समिती नेमण्यात आलीय. त्याचा अहवालही पक्षश्रेष्ठींना सादर झाला आहे. मात्र, यावर काय कारवाई होते याची आम्ही वाट पाहोत, असंही चव्हाण यांनी यावेळी सांगितलं. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे विधान केलंय. विधान परिषदेच्या निवडणुकीत चंद्रकांत हंडोरे हे कॉंग्रेसचे पहिल्या पसंतीचे उमेदवार होते; पण कॉंग्रेसच्या सात आमदारांनी पैसे घेऊन भाजपला मतदान केल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी स्पष्ट केलं.