बोंडारवाडी धरणासाठी श्रमिक मुक्ती दलाचा साताऱ्यात मोर्चा
कण्हेर पाणलोट क्षेत्रातील ५४ गावचे ग्रामस्थ आक्रमक
श्रमिक मुक्ती दलाचा विजय असो, एक लाडू दोन लाडू प्रशासनाला येथेच गाडू, बोंडारवाडी धरण झालेच पाहिजे, पाणी आमच्या हक्काचे नाही कुणाचे बापाचे, अशा घोषणा देत कण्हेर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील ५४ गावांसाठी शेती व पिण्याच्या पाण्यासाठी बोंडारवाडी धरण बांधावे, या मागणीसाठी जिल्हा परिषद ते जिल्हाधिकारी कार्यालय असा श्रमिक मुक्ती दल व बोंडारवाडी धरण कृती समितीच्यावतीने विराट मोर्चा काढण्यात आला.
सातारा : श्रमिक मुक्ती दलाचा विजय असो, एक लाडू दोन लाडू प्रशासनाला येथेच गाडू, बोंडारवाडी धरण झालेच पाहिजे, पाणी आमच्या हक्काचे नाही कुणाचे बापाचे, अशा घोषणा देत कण्हेर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील ५४ गावांसाठी शेती व पिण्याच्या पाण्यासाठी बोंडारवाडी धरण बांधावे, या मागणीसाठी जिल्हा परिषद ते जिल्हाधिकारी कार्यालय असा श्रमिक मुक्ती दल व बोंडारवाडी धरण कृती समितीच्यावतीने विराट मोर्चा काढण्यात आला.
कण्हेर धरणाच्या ६ टक्के राखीव पाण्यातून बोंडारजवळ धरण बांधण्याच्या मागणीचा प्रस्ताव करून कार्यवाहीचे आदेश जिल्हाधिकार्यांनी दिले आहेत. मात्र, जलसंपदा विभागाकडून दोन महिने झाल्यानंतरही मंत्रालयात हा प्रस्ताव सादर करण्यात आलेला नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. यावर योग्य तो निर्णय न झाल्याने श्रमिक मुक्ती दल व बोंडारवाडी धरण कृती समितीच्यावतीने मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चात सुमारे ५४ गावातील एक हजाराहून अधिक नागरिक सहभागी झाले होते. जिल्हा परिषद ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला. यावेळी अनेक महिला डोक्यावर हंडा, कळशी घेऊन मोर्चात सहभागी झाल्या होत्या. यावेळी श्रमिक मुक्ती दलाचा विजय असो, एक लाडू दोन लाडू प्रशासनाला येथेच गाडू, बोंडारवाडी धरण झालेच पाहिजे, पाणी आमच्या हक्काचे नाही कुणाचे बापाचे आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्ची खाली करा, ५४ गावच्या एकजुटीचा विजय असो, जय जवान जय किसान अशा घोषणा देण्यात आल्या. आम्हाला पिण्यासह शेतीला पाणी मिळालेच पाहिजे असा निर्धार नागरिकांनी केला.
दरम्यान, जिल्हाधिकारी यांनी दि. ५ एप्रिल रोजी बैठक लावू असे आश्वासन दिल्याने बेमुदत ठिय्या आंदोलन रद्द करण्यात आले. मात्र, बैठकीत तोडगा न निघाल्यास पुढील आंदोलनाची दिशा ठरेल असा इशारा डॉ. भारत पाटणकर यांनी जिल्हा प्रशासनाला यावेळी दिला. मोर्चाला नागरिक मोठ्या संख्येने आल्याने सातारा शहर पोलिसांकडून जिल्हा परिषद ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मोर्चात श्रमूदचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर, विजय मोकाशी, आदिनाथ ओंबळे, जगन्नाथ जाधव, चैतन्य दळवी, रवींद्र सल्लक, संतोष गोटल, विलास शिर्के यांच्यासह महिला, तरुण, वयोवृद्ध मोठ्या संख्येने उपस्थित होते.