maharashtra

पालिकेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे साताऱ्यात लाक्षणिक उपोषण

नोटीसा देऊनही ठेकेदार ऐकेनात

सातारा पालिकेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मासिक पगारा एवढा मिळावा, तसेच त्यांना किमान वेतन कायद्याप्रमाणे वेतन मिळावे, कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामादरम्यान आरोग्य सुविधा मिळाव्यात या विविध मागण्यांसाठी पालिकेतील सुमारे 52 कंत्राटी कर्मचाऱ्यांनी साताऱ्यात मंगळवारी लाक्षणिक उपोषण केले.

सातारा : सातारा पालिकेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मासिक पगारा एवढा मिळावा, तसेच त्यांना किमान वेतन कायद्याप्रमाणे वेतन मिळावे, कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामादरम्यान आरोग्य सुविधा मिळाव्यात या विविध मागण्यांसाठी पालिकेतील सुमारे 52 कंत्राटी कर्मचाऱ्यांनी साताऱ्यात मंगळवारी लाक्षणिक उपोषण केले.
मुख्याधिकाऱ्यांनी यासंदर्भात दोनवेळा बैठक घेऊन ठेकेदारांना नोटीसा बजावल्या. मात्र ठेकेदारांची मनमानी सुरू आहे, असा आरोप रिपाईचे सातारा जिल्हा रोजगार आघाडीचे अध्यक्ष गणेश वाघमारे यांनी केला आहे.
वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली कामगारांच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले. या निवेदनात नमूद आहे की,  नगरपालिकेच्या कंत्राटी कर्मचारी यांना किमान वेतन कायदा 1970 नुसार बोनस व पगार दिला जावा, कर्मचाऱ्यांचा आकस्मित मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला सहाय्य म्हणून आर्थिक मदत मिळावी, कर्मचाऱ्यांना नियमानुसार ओळखपत्र मिळावे, हजेरी रजिस्टर मध्ये त्यांची नोंद केली जावी, कामादरम्यान सेवकांना हातमोजे, ड्रेस, सेफ्टी शूज, टोपी, मास्क, जॅकेट अशा सुविधा मिळाव्यात, कंत्राटी कर्मचाऱ्यांचा आरोग्य विमा काढला जावा, तसेच त्यांचा भविष्य निर्वाह निधीची सोय व्हावी, अशा विविध मागण्या निवेदनात नमूद होत्या.
मात्र ठेकेदार राजकीय दबावातून सदर कर्मचाऱ्यांना कोणत्याही सुविधा देत नसून किमान वेतन कायद्याप्रमाणे त्यांना पगारही मिळत नसल्याचा आरोप रिपाईच्या रोजगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष गणेश वाघमारे यांनी केला. मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर पन्नास कंत्राटी कर्मचाऱ्यांनी वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली लाक्षणिक उपोषण केले.
यावेळी वाघमारे म्हणाले, या संदर्भात मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्याबरोबर चार बैठका झाल्या. या बैठकानुसार सदर निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही. मुख्याधिकाऱ्यांनी संबंधित ठेकेदारांना नोटिसा काढल्या. मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. ठेकेदारांची अद्यापही मनमानी सुरू आहे. या ठेकेदारांना तातडीने समज देऊन सदर निर्णयाची अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी वाघमारे यांनी केली आहे.