maharashtra

राज्य परिवहन महामंडळ कर्मचार्‍यांच्या आंदोलनास मनसेचा जाहीर पाठिंबा


MNS publicly supports the agitation of State Transport Corporation employees
राज्य परिवहन (एसटी) महामंडळाचे शासनात विलीनीकरण व्हावे, या मागणीसाठी सातारा आगारात कर्मचार्‍यांनी बंद पाळला आहे. या आंदोलनास महाराष्ट्र नवनिर्माण सेना सातारा जिल्हाध्यक्ष युवराज पवार यांनी जाहीर पाठिंबा दिला असून त्यांच्या या पाठिंब्याने आंदोलकांमध्ये नवचेतना निर्माण झाली आहे.

सातारा : राज्य परिवहन (एसटी) महामंडळाचे शासनात विलीनीकरण व्हावे, या मागणीसाठी सातारा आगारात कर्मचार्‍यांनी बंद पाळला आहे. या आंदोलनास महाराष्ट्र नवनिर्माण सेना सातारा जिल्हाध्यक्ष युवराज पवार यांनी जाहीर पाठिंबा दिला असून त्यांच्या या पाठिंब्याने आंदोलकांमध्ये नवचेतना निर्माण झाली आहे.
राज्य परिवहन (एसटी) महामंडळाचे शासनात विलीनीकरण व्हावे, या मागणीसाठी राज्यभर कर्मचार्‍यांचे आंदोलन सुरु आहे. सातारा बस स्थानकाबाहेरही कर्मचार्‍यांनी ठिय्या आंदोलन केले असून आगारातून दिवसभरात एकही बस सोडण्यात आलेली नाही. तसेच जोपर्यंत आमची विलीनीकरणाची मागणी पूर्ण होत नाही. तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा पवित्रा एसटी कर्मचार्‍यांनी घेतला आहे.
येथील बस स्थानकाबाहेर सोमवारी 8 रोजी आगारातील एसटी कर्मचार्‍यांनी ठिय्या आंदोलन केले. तसेच यावेळी बाहेरून बस स्थानकावर आलेल्या एसटी बस अडवून कर्मचार्‍यांनी संताप व्यक्त केला. दरम्यान, या आंदोलनात सहभागी होत ठोस निर्णय होऊन संप मिटेपर्यंत सातारा बस स्थानकावर एसटी बस न आणण्याच्या सूचनाही एसटी महामंडळाच्या आंदोलक कर्मचार्‍यांनी संबंधित बस चालक, वाहकांना दिल्या. 
एसटी कर्मचार्‍यांच्या या आंदोलनास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सातारा जिल्हाध्यक्ष युवराज पवार यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. युवराज पवार म्हणाले, एसटी कर्मचार्‍यांची शासनात विलीनीकरण करण्याची मागणी अगदी रास्त आहे. या आंदोलनात महाराष्ट्र नवनिर्माण सेना सातारा जिल्हा या आंदोलकांच्या पाठिशी आहे. यावेळी आंदोलक कर्मचार्‍यांनी जोरदार घोषणाबाजी केली. याप्रसंगी युवराज पवार यांच्या समवेत मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.