maharashtra

पुसेगावचा विकास आराखडा मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार : ना. बाळासाहेब पाटील


Will try to sort out the development plan of Pusegaon: Balasaheb Patil
श्री सेवागिरी महाराजांच्या पुण्यस्मरणानिमित्त भरणारी यात्रा ही सर्वसामान्य आणि गोरगरीब जनतेची आहे. या यात्रेदरम्यान होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये तळागाळातील प्रत्येकाचा सहभाग असतो. त्यामुळे ही यात्रा आगळीवेगळी असून या यात्रेला विशेष महत्त्व आहे. या यात्रेची ख्याती आणखी वाढावी म्हणून आणि पुसेगावचा विकास आराखडा मार्गी लावण्यासाठी कायम प्रयत्नशील राहणार आहे, असे प्रतिपादन सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांनी केले.

पुसेगाव : महाराष्ट्रातील लाखों भाविकांचे प्रेरणास्थान आणि शेतकऱ्यांची यात्रा म्हणून नावलौकिक असलेली खटाव तालुक्यातील पुसेगाव येथील प पू सद्गुगुरु श्री सेवागिरी महाराजांच्या पुण्यस्मरणानिमित्त भरणारी यात्रा ही सर्वसामान्य आणि गोरगरीब जनतेची आहे. या यात्रेदरम्यान होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये तळागाळातील प्रत्येकाचा सहभाग असतो. त्यामुळे ही यात्रा आगळीवेगळी असून या यात्रेला विशेष महत्त्व आहे. या यात्रेची ख्याती आणखी वाढावी म्हणून आणि पुसेगावचा विकास आराखडा मार्गी लावण्यासाठी कायम प्रयत्नशील राहणार आहे, असे प्रतिपादन सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांनी केले.
प. पू. सद्गुरु श्रीसेवागिरी महाराजांच्या ७४ व्या पुण्यस्मरणानिमित्त रथोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रथाचे आणि संजीवन समाधीचे दर्शन ना. पाटील यांनी घेतले. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी खा. श्रीनिवास पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते, प्रांताधिकारी जनार्धन कासार, सहाय्यक निबंधक श्रीमती
विजया बाबर, तलाठी गणेश बोबडे, मठाधिपती श्री सुंदरगिरी महाराज, ट्रस्टचे चेअरमन मोहनराव जाधव, विश्वस्त डॉ. सुरेश जाधव, योगेश देशमुख, प्रताप जाधव, रणधीर जाधव, सुरेशशेठ जाधव, सरपंच विजय मसणे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील, प्रदीप जाधव उपस्थित होते.
ना. पाटील म्हणाले, श्रध्दास्थान श्री सेवागिरी महाराजांचे आर्शिवाद मी नेहमीच घेतो. महाराजांच्या संजीवन समधीपुढे नतमतस्क होण्यासाठी वारंवार येत असतो. यात्रेतील बैलवाजारास दरवर्षी आवर्जून भेट देऊन बाजारातील जनावरांची माहिती घेतो. देवस्थानची विकासकामे मार्गी लावण्याचे काम महाराजांच्या आशीर्वादाने मी नक्की करेन तसेच विकासकामांना निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही ना. पाटील यांनी दिली.
श्री सेवागिरी देवस्थानच्या रखडलेल्या विकासकामांची माहिती देवस्थानचे माजी चेअरमन डॉ. सुरेश जाधव यांनी ना. बाळासाहेब पाटील आणि खा. श्रीनिवास पाटील यांना दिली. तसेच पुसेगावचा विकास आराखडा तयार करुन पुसेगावचे वैभव वाढवावे, अशी मागणी केली. प्रास्तविक डॉ. सुरेश जाधव यांनी केले. सूत्रसंचलन मोहन गुरव तर आभार योगेश देशमुख यांनी मानले.