सातारा जिल्ह्यातील संभूखेडच्या जवानाचा राजस्थानात मृत्यू
आज संभूखेड येथे करण्यात येणार अंत्यसंस्कार
संभूखेडचा (ता. माण) सुपुत्र जवान सचिन विश्वनाथ काटे (वय 24) यांचा राजस्थानमध्ये देशसेवा करताना मृत्यू झाला आहे. आज (शनिवार) संभूखेड येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
माण : संभूखेडचा (ता. माण) सुपुत्र जवान सचिन विश्वनाथ काटे (वय 24) यांचा राजस्थानमध्ये देशसेवा करताना मृत्यू झाला आहे. आज (शनिवार) संभूखेड येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी, राजस्थानमधील बाडमेरजवळील जासई मिलिटरी कॅन्टोन्मेंट येथे सचिन काटे देशसेवा करत होते. २० ऑक्टोबर रोजी रात्री दहा ते मध्यरात्री तो प्रत्यक्ष कर्तव्य करत होता. पहाटे चार वाजता पुन्हा त्याची ड्यूटी होती; पण तो ड्यूटीवर न आल्याने त्याच्या सहकाऱ्यांनी त्याचा शोध सुरू केला. शोध घेतला असता सचिन हा झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला. जवानांनी तत्काळ सचिनला लष्करी रुग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरांनी सचिनला मृत घोषित केले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून, लष्करानेही तपासाचे आदेश दिले आहेत, अशी माहिती पोलिस स्टेशन हाऊस ऑफिसर परबत सिंग यांनी दिली आहे.
सचिन काटे याने अतिशय हलाखीच्या परिस्थितीतून दहिवडी कॉलेज दहिवडी येथे शिक्षण घेत असतानाच सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण स्वराज ॲकॅडमी दहिवडी येथे घेतले. अतिशय चपळ, एक ऊर्जावान तरुण, तसेच उत्कृष्ट क्रिकेटपटू, फुटबॉल, कबड्डी खेळाडू म्हणून त्याची ओळख होती. २०१६ मध्ये तो सैन्यात भरती झाला होता. त्यानंतर त्याचा भाऊही सैन्यात भरती झाला. गावी घराचे काम सुरू असून, त्यानंतर लग्न करण्याचे त्याचे स्वप्न होते; पण हे स्वप्न अपूर्णच राहिले. फक्त पाच वर्षांची देशसेवा झाली असतानाच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण माण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. सचिनच्या मागे आई-वडील, भाऊ असा परिवार आहे.