maharashtra

एसटी बस आणि डंपरची समोरासमोर धडक

५ जण किरकोळ जखमी; दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान

पाचगणी - वाई या मार्गावर शेरबाग जवळ एसटी बस आणि डंपरची समोरासमोर धडक होवून झालेल्या भीषण अपघातात ५ जण किरकोळ जखमी झाले असल्याची माहिती मिळत आहे.

पाचगणी : पाचगणी - वाई या मार्गावर शेरबाग जवळ एसटी बस आणि डंपरची समोरासमोर धडक होवून झालेल्या भीषण अपघातात ५ जण किरकोळ जखमी झाले असल्याची माहिती मिळत आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, पाचगणीहून वाईकडे जाणारी रोहा - सातारा (बस क्रमांक एम एच १४ बी टी ४९१७ ) ही निमआराम बस शेरबाग जवळ उतारावर आली असता नुकत्याच पडलेल्या पावसाने घसरड्या रस्त्यावरून घसरून वाईहून पांचगणीकडे येणारा डंपर (क्रमांक एम एच ११ सी जे ६२४७ ) यावर समोरासमोर जोरदार धडक दिली. त्यामुळे दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून बसमध्ये असणाऱ्या २९ प्रवाशांपैकी पाच-सहा प्रवाशांना जखमा झाल्या आहेत.
लागलीच घटनेची माहिती मिळताच पाचगणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माने दाखल झाले. तर एसओएस टीमचे सर्व सदस्य या ठिकाणी मदतीसाठी धावून आले. यातील जखमींना उपचारासाठी या सदस्यांनी लागलीच बेल एअर व पांचगणी ग्रामीण रुग्णालयात नगरपालिका व बेल एअरच्या रुग्णवाहिकेतून दाखल केले आहे. पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. या अपघाताने दोन्ही वाहने जागेवरच रस्त्यात उभी असल्याने दोन्ही बाजूकडील वाहतूक ठप्प झाल्याने पोलिसांना ही वाहतूक सुरळीत करण्यासाठी कसरत करावी लागली.