maharashtra

अंधारवाडीचे प्रथम लोकनियुक्त सरपंच धोंडीराम बर्गे राजर्षी शाहू सरपंचरत्न पुरस्काराने सन्मानित


अंधारवाडीचे प्रथम लोकनियुक्त सरपंच धोंडीराम बर्गे यांना राजर्षी शाहू सरपंचरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

उंब्रज : अंधारवाडीचे प्रथम लोकनियुक्त सरपंच धोंडीराम बर्गे यांना राजर्षी शाहू सरपंचरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
लोकसहभागातून कामास सुरुवात केली तर अशक्य असणारी कामे ही पूर्ण होतात. आणि गावचा विकास समृद्धीकडे होत असतो. उदरनिर्वाहासाठी आपलं गाव सोडून मुंबईमध्ये संसार प्रपंचाचा गाडा चालवताना देखील मनात असलेली चुनचुन आपल्या गावासाठी आपण काय करू शकतो हा ध्यास त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. मुंबईत जरी कामाला असले तरी वेळात वेळ काढून गावातील सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमात ते सक्रिय होऊन सहभागी होतात. मुंबईतून सेवानिवृत्त झाल्यानंतर आपल्या गावच्या विकासासाठी सरपंच पदासाठी ते उभे राहिले आणि लोकांनी त्यांना बहुसंख्येने निवडूनही दिले. मतदारांनी दिलेल्या संधीचे सोने करायचे हा ध्यास उराशी धरून गावांमधील कित्येक रखडलेली कामे त्यांनी पूर्णत्वास नेली. गेली कित्येक वर्षे रखडलेल्या अंधारवाडी येथील वाघजाई देवस्थान ला जाणार्‍या रस्त्याचे काम त्यांनी पूर्णत्वास नेले. गावातील लोकांना शुद्ध पाणी पिण्यासाठी (वॉटर प्युरिफायर) फिल्टरिंगचे मशीनही बसवले. वेळोवेळी खासदार आणि आमदारांकडे कामांचा पाठपुरावा करून मंजूर करून आणलेल्या पाण्याच्या टाकीसाठी पर्यायी त्यांनी स्वतःची जागाही गावासाठी दान केली. लोक त्यांना योग गुरू या नावाने देखील ओळखतात. आरोग्याच्या दृष्टीने आपल्या दैनंदिन जीवनात योगाचे महत्त्व पटवून देण्यासाठी ते योग शिबिराचे देखील आयोजन करतात आणि आपली ही योग सेवा ते निःशुल्क आजही देत आले आहेत.
तसेच अंधारवाडी गावच्या नामांतराचा प्रस्ताव महसूल विभागाकडून सामान्य प्रशासन विभागाकडे पोहच झाली आहेत. हा प्रस्ताव केंद्र शासनाकडेही पाठविण्यात येणार असल्याचे अंधारवाडी गावाचे लोकनियुक्त सरपंच धोंडीराम बर्गे यांनी सांगितले. त्यांच्या या कामाची दखल पुणे येथील राजर्षी शाहू प्रतिष्ठान आणि दक्ष मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने देण्यात येणारा राजर्षी शाहू सरपंचरत्न पुरस्कार बर्गे यांना देण्यात आला. हा पुरस्कार त्यांना सपत्नीक सौ.बर्गे यांना ना.अतुल सावे सहकार,मागास व बहुजन कल्याण मंत्री यांच्या हस्ते देण्यात आला.त्यामुळे अंधारवाडी गावच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेल्याने ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी उपसरपंच प्रकाश मारुती शेजवळ, माजी उपसरपंच संतोष रामचंद्र जाधव, सुनील गणपती निगडे ग्रा. पं.सदस्य, विठ्ठल दत्तात्रय सुळे माजी ग्रा. पं.सदस्य, तानाजी पांडुरंग शेजवळ, दत्तात्रय बबन शेजवळ, कृष्ण विलास थोरात, सचिन पांडुरंग बर्गे हे उपस्थित होते.