पळसावडे, ता. सातारा येथील माजी सरपंच रामचंद्र जानकर याने गर्भवती महिला वनरक्षकाला केलेली मारहाणीची घटना ही अमानवीय अशीच आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महिला बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, राज्याचे गृह विभाग आणि गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई भाष्य करायला तयार नाहीत. त्यावरुन ते आपली जबाबदारी झटकत आहेत, हे स्पष्ट होत असून याप्रकरणी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी राजीनामा द्यावा
सातारा : पळसावडे, ता. सातारा येथील माजी सरपंच रामचंद्र जानकर याने गर्भवती महिला वनरक्षकाला केलेली मारहाणीची घटना ही अमानवीय अशीच आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महिला बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, राज्याचे गृह विभाग आणि गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई भाष्य करायला तयार नाहीत. त्यावरुन ते आपली जबाबदारी झटकत आहेत, हे स्पष्ट होत असून याप्रकरणी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपा बेटी बचाव, बेटी पढाओ आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा डॉ. शुभा फरांदे-पाध्ये यांनी पत्रकार परिषदेत केली.
डॉ. शुभा फरांदे - पाध्ये यांनी आज सातारा येथे येऊन मारहाण झालेल्या महिला वनरक्षकाची विचारपूस करून याप्रकरणी पोलीस अधीक्षक अजय बन्सल यांना निवेदन दिले. त्यानंतर शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी प्रदेश कार्यकारणी सदस्य सौ. मनीषा पांडे उपस्थित होत्या.
त्या पुढे म्हणाल्या, पळसावडे येथे महिला वनरक्षक सिंधू बाजीराव सानप हिला माजी सरपंच रामचंद्र जानकर याने बेदम मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. या महिलेला मारहाण होताना अनेकजण उपस्थित असल्याचे दिसते. मात्र एकही जण त्या महिला वनरक्षकाला वाचवण्यासाठी पुढे आला नाही. यावरून रामचंद्र जानकर याची तिथे किती दहशत आहे, हेच स्पष्ट होते. या घटनेची गंभीर दखल घेऊन आम्ही आज पोलीस अधीक्षक अजय बन्सल यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले असून रामचंद्र जानकर याने केलेले कृत्य अत्यंत निंदनीय आहे. या घटनेमुळे शासकीय सेवा करणाऱ्या सावित्रीच्या लेकी सुरक्षित नाहीत हे सिद्ध होते. राज्य सरकार या अनुषंगाने कोणतीही भूमिका स्पष्ट करत नाही. पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन जानकर याला कडक शिक्षा होईल त्यादृष्टीने तपास करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
त्या पुढे म्हणाल्या, गेल्या दोन वर्षांमध्ये महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचारांच्या घटनेत वाढ झाली आहे. शक्ती कायदा मंजूर झाला असला तरी त्यावर अद्याप राज्यपालांची स्वाक्षरी झालेली नाही. पळसावडे येथे गर्भवती महिला वनमजुराला मारहाण याच्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, राज्याचे गृहमंत्री आणि गृहराज्यमंत्री भाष्य करीत नाहीत. त्यामुळे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा.
दि. १७ जानेवारी रोजी संबंधित महिला व मजुराला जानकर याने तेथील वन हद्दीत प्रवेश करू नका अशी धमकी दिली होती. तेव्हा संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याची दखल घेतली असती तर त्या महिलेला मारहाण झालीच नसती, असेही त्यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले.