मराठा महासंघाच्या प्रदेश उपाध्यक्षांवर दोघांकडून गोळीबार
मोरवे वाघोशी रस्त्यावरचा थरार, सुदैवाने कोणीही जखमी नाही
खंडाळा तालुक्यातील मोर्वे-वाघोशी रस्त्यावर मराठा महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद कोंडे हे आपल्या चारचाकी वाहनाने प्रवास करत असताना त्यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गोळीबार केला. ही घटना मंगळवारी दुपारी सव्वा च्या दरम्यान घडली.
सातारा : खंडाळा तालुक्यातील मोर्वे-वाघोशी रस्त्यावर मराठा महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद कोंडे हे आपल्या चारचाकी वाहनाने प्रवास करत असताना त्यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गोळीबार केला. ही घटना मंगळवारी दुपारी सव्वा च्या दरम्यान घडली. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली असून घटनास्थळी रिकाम्या गोळीचे पुंगळी आढळून आली आहे. लोणंद आणि खंडाळा पोलिसांनी तात्काळ धाव घेऊन या प्रकरणाचा तपास तातडीने सुरू केला आहे.
या प्रकरणाची अधिक माहिती अशी, प्रसाद कोंडे आपल्या चारचाकी गाडीने मोर्वे-वाघोशी रस्त्यावरील श्री दत्त मंदिरात दर्शनासाठी आले होते. तिथून माघारी गाडीत बसून परतत असताना मोरवे वाघोशी रस्त्यावर अचानक पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञातांनी त्यांच्यावर अचानक गोळीबार केला.
मात्र या गोळीबारामध्ये कोंडे बचावले. याचवेळी कोंडे यांच्या सुरक्षारक्षकाने बचावासाठी म्हणून हल्लेखोरांवर गोळीबार केला. या क्रॉस फायरिंग मध्ये कोणीही जखमी झाले नाही. संबधित युवक दुचाकीवरून वेगाने पसार झाले. मात्र भरदुपारी झालेल्या या फायरिंग प्रकरणामुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या प्रकरणाची माहिती मिळताच खंडाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश इंगळे, लोणंद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर तातडीने घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी गोळीची रिकामी पुंगळी आढळून आली आहे. सातारा जिल्ह्यामध्ये गेल्या काही महिन्यापासून फायरिंगचे थरारक प्रकार घडत आहेत. सातारा शहरात गोलबाग आणि मनामती चौकामध्ये फायरिंग चे दोन थरारक प्रकार घडल्याने शहरातच कायदा सुव्यवस्थेला आव्हान निर्माण झाले आहे आणि याच प्रकाराची पुनरावृत्ती खंडाळा तालुक्यात झाल्याने नक्की हा प्रकार कोणत्या कारणास्तव घडला असावा हे तपासण्याचे मोठ्या आव्हान खंडाळा पोलिसांपुढे उभे राहिले आहे. यासंदर्भात पोलीस निरीक्षक महेश इंगळे यांनी तातडीने तपास पथके रवाना केली आहेत. संबंधित दुचाकीस्वारांचा कसून शोध घेतला जात असून यंत्रणा गतिमान झाली आहे.