maharashtra

चिंतामणी पार्श्वनाथ ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेत अपहार करणारे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

24 कोटी एक लाख 60 हजार 761 रुपयांचा झाला होता अपहार

श्री 1008 चिंतामणी पार्श्वनाथ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था कोळकी पतसंस्थेमध्ये 24 कोटी एक लाख 60 हजार 761 रुपयांचा अपहार करणाऱ्या सहा संचालकांना तीन वर्षानंतर स्थानिक गुन्हे शाखेने फलटण येथून कारवाई करून अटक केली.

सातारा : श्री 1008 चिंतामणी पार्श्वनाथ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था कोळकी पतसंस्थेमध्ये 24 कोटी एक लाख 60 हजार 761 रुपयांचा अपहार करणाऱ्या सहा संचालकांना तीन वर्षानंतर स्थानिक गुन्हे शाखेने फलटण येथून कारवाई करून अटक केली.
प्रदीप बापूचंद गांधी वय 65 राहणार पुणे पंढरपूर रोड रानडे पंपा शेजारी फलटण, धनेश नवलचंद शहा वय 57 राहणार 217 शुक्रवार पेठ फलटण, भूषण कांतीलाल जोशी वय 65 राहणार शुक्रवार पेठ फलटण, नाना खंडू लांडगे राहणार मौजे निंभोरे तालुका फलटण, लाला तुकाराम मोहिते, अजय अरविंद शहा राहणार मोती चौक रविवार पेठ फलटण अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
पोलीस अधीक्षक समीर शेख व अतिरिक्त पोलीस अधीक्षक बापू बांगर यांनी सातारा जिल्ह्यातील आर्थिक गुन्ह्यांमध्ये गुन्हे तातडीने निकाली लावण्याचे निर्देश दिले होते. या प्रकरणाच्या संदर्भात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना सदर आरोपी फलटण येथे येणार असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली होती. त्यानुसार दिनांक 14 रोजी फलटण परिसरात सापळा लावण्यात आला. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस अधीक्षक मोहन शिंदे यांच्या सूचनेनुसार तपास अधिकारी शिवाजी भोसले आणि त्यांच्या पथकाने फलटण शहर आणि आजूबाजूच्या परिसरात आरोपींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले आणि त्यांच्या गुन्ह्यातील सहभाग प्राथमिक चौकशीनंतर निष्पन्न करण्यात आला.
या कारवाईमध्ये प्रमोद नलावडे, मनोज जाधव, संतोष राऊत, शफिक शेख, प्रसाद जाधव यांनी सहभाग घेतला.