maharashtra

खासदार उदयनराजे भोसले यांनी घेतली पोलीस अधीक्षकांची भेट

गोडसे मारहाण प्रकरणात न्याय देण्याची केली मागणी

साताऱ्याच्या माजी उपनगराध्यक्ष दिपाली गोडसे आणि त्यांचे पती राजू गोडसे व भाजपचे माजी नगरसेवक धनंजय जांभळे यांच्यात झालेल्या धक्काबुक्कीचे जोरदार राजकीय पडसाद साताऱ्यात उमटले आहेत. याप्रकरणी गोडसे दांपत्याला पोलिसांनी न्याय द्यावा, या मागणीसाठी खासदार उदयनराजे भोसले यांनी शुक्रवारी पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांची भेट घेतली.

सातारा : साताऱ्याच्या माजी उपनगराध्यक्ष दिपाली गोडसे आणि त्यांचे पती राजू गोडसे व भाजपचे माजी नगरसेवक धनंजय जांभळे यांच्यात झालेल्या धक्काबुक्कीचे जोरदार राजकीय पडसाद साताऱ्यात उमटले आहेत. याप्रकरणी गोडसे दांपत्याला पोलिसांनी न्याय द्यावा, या मागणीसाठी खासदार उदयनराजे भोसले यांनी शुक्रवारी पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी संबंधितांवर कोणत्याही दबावाला बळी न पडता कारवाई व्हावी, अशी मागणी केली.
येथील यादोगोपाळ पेठेत दसऱ्याच्या दिवशी सप्ततारा मित्र मंडळाचे अध्यक्ष राजू गोडसे व माजी नगरसेवक धनंजय जांभळे यांच्यात जोरदार भांडणे होऊन धक्काबुक्की झाली. यामध्ये दिपाली गोडसे यांनाही धक्काबुक्की होऊन हाताला दुखापत झाल्याने साताऱ्याच्या राजकीय वर्तुळात या घटनेचे जोरदार पडसाद उमटले. खासदार उदयनराजे भोसले यांनी या प्रकरणात स्वतः लक्ष घालून गोडसे दांपत्याची घरी जाऊन भेट घेतली आणि आस्थेने विचारपूस केली. घडल्या प्रकाराबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत हे प्रकरण थेट पोलीस अधीक्षकांकडे नेणार असल्याचे आश्वासन दिले होते.
त्या आश्वासनाप्रमाणे शुक्रवारी उदयनराजे भोसले, राजू गोडसे, दिपाली गोडसे तसेच उदयनराजे समर्थक शनिवारी सायंकाळी पाच वाजता थेट पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांच्याकडे पोहोचले. घडला प्रकार अतिशय निंदनीय असून एका महिला नगरसेविकेला मारहाण व्हावी ही घटना चीड आणणारी आहे. यासंदर्भात पोलीस अधीक्षकांनी थेट संबंधितांवर कारवाई करावी. ही कारवाई कोणत्याही दबावाशिवाय पार पाडावी, अशी थेट विनंती खासदार उदयनराजे भोसले यांनी अजय कुमार बंसल यांना केली. पोलीस अधीक्षकांनी सुद्धा त्यांना तसे आश्वासन दिले.
प्रसार माध्यमांसमोर बोलताना उदयनराजे म्हणाले, एखाद्या महिला नगरसेविकेला साताऱ्यात मारहाण होते, हा प्रकारच अत्यंत खेदजनक आहे. या प्रकारामध्ये पोलिसांनी लक्ष घालून गोडसे दांपत्याला न्याय मिळवून द्यावा. आमचा लोकशाहीवर प्रचंड विश्वास आहे. यापुढे कोणीही असा प्रकार केल्यास त्याची गय केली जाणार नाही, असाही थेट इशारा उदयनराजे यांनी दिला.