maharashtra

ओमिक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणा सुसज्ज ठेवा : जिल्हाधिकारी शेखर सिंह


Keep all systems equipped against the background of Omicron virus: Collector Shekhar Singh
ओमिक्रॉन विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांसह सर्व यंत्रणा  प्रशासनाने सुसज्ज ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी  शेखर सिंह यांनी दिले.  

सातारा : ओमिक्रॉन विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांसह सर्व यंत्रणा  प्रशासनाने सुसज्ज ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी  शेखर सिंह यांनी दिले.  
कोविड -19 प्रादर्भाव नियंत्रणासाठी करावयाच्या उपाययोजनाबाबतची जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात बैठक संपन्न झाली. यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह बोलत होते. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी राधाकिशन पवार यांच्यासह आरोग्य विभागातील व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह म्हणाले, कोरोना प्रतिबंधक पहिला डोस घेणाऱ्यांनी दुसरा डोसही प्राधान्याने घेण्यासाठी यंत्रणांनी प्रयत्न करावेत. ओमिक्रॉनचा धोका पाहता लसीकरणाला गती द्यावी. जिल्ह्यातील खासगी आस्थापंनामध्ये कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन होत नसल्याचे निदर्शनास येत आहे. जे खासगी आस्थापना नियमांचे पालन करणार नाही अशांवर दंडात्मक कारवाई करावी.
पोलीस विभागाने ज्याठिकाणी विवाह व सार्वजनिक समारंभ होत आहे तेथे भेट देवून तपासणी करावी. नियमांचे पालन होत नसल्यास कारवाई करावी. शासकीय कार्यालयांमध्ये नागरिकांना लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र पाहूनच प्रवेश देण्यात यावा. नगर परिषद व नगर पंचायतींमधील कर्मचाऱ्यांचे 100 टक्के लसीकरण झाले आहे की नाही याची तपासणी करावी. ज्या शासकीय रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन प्लँट मंजुर केले आहेत त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे. तसेच ज्याठिकाणी ऑक्सिजन प्लँट कार्यान्वीत आहेत त्याची काटेकोरपणे तपासणी करावी. ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर पुरेसा औषधसाठा उपलब्ध करुन घेण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केल्या.
ऑक्सिजन सिलेंडर, व्हेटीलेटर्स, रेमडीसिव्हर, बालकांना लागणारी आय.व्ही. फ्ल्यूडसचा पुरेसा साठा आरोग्य विभागाने उपलब्ध ठेवावा. तसेच भविष्यात उद्भवणाऱ्या संभाव्य परिस्थितीला तोंड देण्यासाठी आत्तापासून सर्व साधण सामुग्री व आवश्यक साधनांचे योग्य नियोजन करावे.  त्यासाठी आर्थिक तरतुद करण्यात आल्याचेही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी यावेळी सांगितले.