maharashtra

आंदोलने होण्यापूर्वीच आंदोलक पोलिसांच्या ताब्यात

जिल्हाधिकारी कार्यालयावर खाकीचा तगडा बंदोबस्त

सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर तब्बल दोन डझन आंदोलनाचा इशारा मिळाल्यामुळे सातारा पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर तगडा बंदोबस्त ठेवला होता. बऱ्याच आंदोलकांना आंदोलन यापूर्वीच ताब्यात घेण्यात आले. मात्र वाठार, तालुका कराड येथील मनसे तालुकाध्यक्ष भारती गावडे या आंदोलक महिलेने केलेला आत्मदहनाचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला.

सातारा : सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर तब्बल दोन डझन आंदोलनाचा इशारा मिळाल्यामुळे सातारा पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर तगडा बंदोबस्त ठेवला होता. बऱ्याच आंदोलकांना आंदोलन यापूर्वीच ताब्यात घेण्यात आले. मात्र वाठार, तालुका कराड येथील मनसे तालुकाध्यक्ष भारती गावडे या आंदोलक महिलेने केलेला आत्मदहनाचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते शासकीय ध्वजवंदन करण्यात आले. सातारा शहर विभागाच्या गोपनीय शाखेला दोन डझन आंदोलनाची निवेदने यापूर्वी प्राप्त झाल्याने पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी मोठा तगडा बंदोबस्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर तैनात केला होता. आदमी पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र खजिनदार सागर भोगावकर यांनी मोळाचा ओढा परिसरातील अतिक्रमण संदर्भात आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र प्रत्यक्ष आंदोलनापूर्वीच शाहूपुरी पोलिसांनी त्यांना तत्काळ ताब्यात घेतले. तसेच वाठार, तालुका कराड येथील भारती गावडे या मनसे तालुका अध्यक्ष जमिनीच्या खरेदी प्रक्रियेत फसवणूक झाल्याचा ठपका महसूल विभागावर ठेवत त्यांच्यावर कारवाई व्हावी याकरिता आक्रमक झाल्या होत्या. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र महिला पोलीस आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या जवानांनी त्यांना वेळीच ताब्यात घेतले.
याशिवाय लोक जनशक्ती पार्टीच्या आंदोलकांनी पीडब्ल्यूडी शाखा कार्यालय सातारा व जिल्हाधिकारी कार्यालय परिसर येथे शांततेच्या मार्गाने आंदोलन केले. मेढा येथील उप अभियंता एसएससी इनामदार यांच्याकडून सर्वे नंबर 670 येथील बेकायदेशीर काम बांधकाम थांबवले जात नाही तसेच मेढा येथे काही ठिकाणी लाखो रुपयांच्या मलिद्यासाठी कोट्यवधी रुपयांचे गौण खनिज उत्खनन आणि वृक्षतोड यासारख्या बाबी मेढा परिसरात सुरू असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. या संदर्भात त्यांची तात्काळ बदली तर झाली नाही तर इनामदार यांना काळे फासून सातारा आणि मेढा या दोन्ही कार्यालयांना टाळे ठोका आंदोलन केले जाईल, असा इशारा लोक जनशक्ती पार्टीच्या आंदोलकांनी दिला आहे. या आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना तत्काळ ताब्यात घेण्यात आले.