maharashtra

जिल्हाधिकार्‍यांच्या चुकीच्या निर्णयाचे परिणाम पुढील असंख्य पिढ्या भोगणार : महारुद्र तिकुंडे


The next generation will suffer the consequences of the wrong decision of the District Collector: Maharudra Tikunde
मोठ्या कष्टाने उभारलेले श्री छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय सन 2017 साली निर्माण झाले. मात्र त्यानंतर या वास्तूचा प्रवास खडतर मार्गातून जात असताना कोविडच्या कालखंडात तो जम्बो कोविड सेंटरमध्ये रुपांतरित झाला. आणि आता तो शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या दिशेने सुरु असून ही वास्तू पुन्हा श्री छत्रपती शिवाजी संग्रहालयास परत मिळावी, अशा आशयाची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते आणि युवा राज्य फौंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष महारुद्र तिकुंडे यांनी सचिव, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्याकडे केली आहे.

सातारा : मोठ्या कष्टाने उभारलेले श्री छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय सन 2017 साली निर्माण झाले. मात्र त्यानंतर या वास्तूचा प्रवास खडतर मार्गातून जात असताना कोविडच्या कालखंडात तो जम्बो कोविड सेंटरमध्ये रुपांतरित झाला. आणि आता तो शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या दिशेने सुरु असून ही वास्तू पुन्हा श्री छत्रपती शिवाजी संग्रहालयास परत मिळावी, अशा आशयाची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते आणि युवा राज्य फौंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष महारुद्र तिकुंडे यांनी सचिव, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्याकडे केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, सातारकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा ठरलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाची नूतन वास्तू अनेक अडचणींवर मात करत अनेक शिवप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, जागरुक पत्रकार यांच्या सर्वांच्या पाठपुराव्याने भव्यदिव्य अशी निर्माण करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील ऐतिहासिक वस्तू पुढील अनेक पिढ्यांना दिसाव्यात, याबाबत लिखाण होण्याबरोबरच त्याबाबतचा अभ्यासही व्हावा, या उदात्त हेतूने महाराष्ट्राचे शिल्पकार, पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या संकल्पनेेतून या वस्तूंचे जतन करण्यात येत आहे.
मात्र सातारा जिल्हाधिकारी यांनी पदाचा व आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा गैरवापर करित ही वास्तू कोरोना महामारीत जम्बो कोविड सेंटरसाठी तात्पुरत्या स्वरुपात पुरातत्व विभागाकडून अधिग्रहित केली. कालपरत्वे कोविड सातार्‍यातून कमी झाल्यानंतर ही वास्तू पुन्हा पुरातत्व विभागाकडे हस्तांतरित करण्याची अपेक्षा असतानाच ही वास्तू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला देण्याच्या हालचाली झाल्या. जेव्हा की ही वास्तू हस्तांतरीत करण्याचा जिल्हाधिकार्‍यांना कोणताही अधिकार नाही. या विरोधात तमाम शिवप्रेमी एकवटले आहेत.
सातार्‍यात कोरोनाने हाहाकार माजला असताना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कोविड-19 रुग्णांसाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाची नूतन वास्तू अधिग्रहित केली. मात्र त्याचवेळेस सातार्‍यात अनेक बड्या इमारती असताना संग्रहालयाची वास्तू का घेण्यात आली, याची उकल झालेली नाही. सातार्‍यातील जुन्या संग्रहालयाची इमारत आणि जागा कमी पडत असल्यामुळे खरेतर खंडोबाच्या माळावर या भव्यदिव्य वास्तूचे निर्माण करण्यात आले होते.
श्री छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाची नूतन वास्तू जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी तात्पुरत्या स्वरुपात पुरातत्व विभागाकडून अधिग्रहित केली होती. या वास्तूमध्ये शेकडो रुग्णांची सुश्रुषा झाली. मात्र कालपरत्वे कोरोना रुग्ण कमी झाल्यानंतर ही वास्तू पुन्हा पुरातत्व विभागाकडे हस्तांतरित करायची असतानाच जिल्हाधिकार्‍यांनी आपल्या पदाचा गैरवापर करीत ही वास्तू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला देण्याचा घाट घातला आहे. ज्या वास्तूमध्ये छत्रपती शिवरायांच्या ऐतिहासिक वस्तू जतन करण्यात येणार होत्या, त्या वास्तूत दुसर्‍या कोणत्याही संस्थेचा शिरकाव झालेला शिवप्रेमी सहन करतील काय? याचाही विचार यावेळी करण्यात आला नसल्याचे दिसून येत आहे.
सातारा ही मराठ्यांची राजधानी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनित झालेली भूमी आहे. याच भूमित जर छत्रपतींच्या ऐतिहासिक ठेव्याला जर जागा मिळत नसेल तर यासारखी दुसरी दुर्भाग्याची गोष्ट कोणतीही नसेल.
आज कोविड - 19 ची रुग्णसंख्या नगण्य असताना सातारा जिल्हाधिकारी पुरातत्व विभागाकडे वास्तू पुनश्‍च: हस्तांतरीत करण्यास टाळाटाळ करताना दिसत आहेत. आपत्ती काळात या वास्तूमध्ये सातारा जिल्ह्यातील तसेच परजिल्ह्यातील अनेक रुग्णांना येथे उपचार मिळाले. यातून कोविड रुग्णांना चांगली आरोग्यसेवापण मिळाली. असे असताना आता कोविड -19 रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झालेली असताना जिल्हाधिकारी सातारा ही वास्तू श्री छत्रपती शिवाजी शासकीय वास्तू संग्रहालयास परत हस्तांतरीत करीत नाहीत, याचा पुढील अनेक असंख्य पिढ्यांना श्री शिवाजी महाराज यांची ऐतिहासिक माहिती मिळण्यास अडथळा निर्माण होत आहे. सध्याच्या स्थितीला श्री शिवाजी महाराज शासकीय वस्तू संग्रहालय हे अत्यंत तोकड्या भाड्याच्या जागेमध्ये सुरु असून तेथे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची गादी, शस्त्रे अशा अमुल्य अशा ठेव्याची अक्षशः विटंबना सुरु असताना दिसत आहे.
श्री शिवाजी महाराज यांची राजधानी असलेल्या राजधानी सातारा येथेच श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची माहिती देणार्‍या वस्तूंनाच जागा मिळत नसल्याचे विदारक चित्र निर्माण झाले आहे. यासाठी पुढाकार घेत माहिती अधिकार कार्यकर्ते आणि युवा राज्य फौंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष महारुद्र तिकुंडे यांनी सचिव, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्याकडे श्री छत्रपती शिवाजी महाराज शासकीय वास्तू संग्रहालय, सातारा ची वास्तू परत पुरातत्व विभागाकडे हस्तांतरित करण्याची मागणी केली आहे.

छ. शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली सातारा ही पवित्र भूमी आहे. छ. शिवाजी महाराजांच्या वंशजांनी सातारला राजधानी बनवले. या सातार्‍यातून संपूर्ण भारतभर मराठा साम्राज्याचा कारभार पाहिला गेला. जेव्हाकी तो मराठा साम्राज्याचा सुवर्णकाळ होता. या  सुवर्ण इतिहासाची साक्ष देणार्‍या बहुमूल्य वस्तूंचा ठेवा जतन करण्यासाठी आणि येणार्‍या असंख्य पिढ्यान्पिढ्या तो स्वतःच्या नेत्राने पाहता यावा म्हणून पुरातत्व विभागाच्या माध्यमातून एवढी भव्यदिव्य वास्तू उभारली गेली. परंतु कोरोना महामारी मध्ये रुग्णांची देखभाल व त्यांच्यावर औषधोपचार व्हावेत म्हणून तातडीने सदर वास्तूचे रूपांतर तात्पुरत्या जम्बो कोविड सेंटर मध्ये करण्यात आले. सद्यस्थितीत कोविड येऊन सुमारे अडीच वर्षांचा कालावधी उलटून गेला आहे. यामध्ये प्रशासनाने पर्यायी व्यवस्थेचे नियोजन करणे अत्यंत गरजेचे असताना प्रशासनाने त्यादृष्टीने कोणतेही पाऊल उचललेले नाही, ही शोकांतिका आहे. प्रशासनाच्या या चुकीच्या धोरणामुळे शिवप्रेमींमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने त्वरित ही वास्तू पुरातत्व विभागास हस्तांतरित करावी अन्यथा प्रशासनाला मोठ्या स्वरूपात चळवळीला सामोरे जावे लागेल.
- सचिन मोहिते, सातारा उपजिल्हा प्रमुख, शिवसेना.

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेच्या नावाखाली छ. शिवाजी महाराज संग्रहालयाची वास्तू ताब्यात घेऊन कोविड सेंटर सुरु करण्याचा घाट पुन्हा घातला जातोय हे चुकीचे आहे. अगोदरच निधीअभावी 4-5 वर्षे रखडलेले बांधकाम पूर्ण होऊन दोन वर्षे पूर्ण झाली. दुसर्‍या लाटेत कोविड सेंटर सुरु करुन अनेकांचे प्राण वाचले ही चांगली बाब आहे. परंतु इतर व्यवस्था न करता हर एक अडचणीत संग्रहालयाच्या वास्तूचा वापर आता प्रशासनाने थांबवावा.
-कपिल राऊत
माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य.

कोविड काळात ताब्यात घेतलेली वास्तू कोविड गेल्यानंतर पुन्हा पुरातत्व विभागाकडे ऐतिहासिक वस्तूंचे जतन होण्यासाठी पुन्हा देणे गरजेचे असताना ती वास्तू पुन्हा दुसर्‍या कोणत्याही कारणासाठी पुन्हा देणे हा शिवप्रेमींवर अन्याय आहे. याविरोधात आम्ही लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरुन लढा उभारु.
- दादासाहेब ओव्हाळ
प्रदेश उपाध्यक्ष, रिपाईं (ए).

युवकांचे प्रेरणास्थान व महाराष्ट्राचे दैवत असलेले श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संग्रहालयाचा वाद अनेक वर्षे धगधगत आहे. ही बाब सातारा जिल्ह्यातील तमाम शिवभक्त, बहुजन समाज उघड्या डोळ्याने पाहत आहे. हा वाद विकोपाला जाण्यापूर्वी सातारा जिल्हा प्रशासनाने व पुरातत्व विभागाने संग्रहालय त्वरित चालू करावे.
- इम्रान मुल्ला
सातारा जिल्हाध्यक्ष, राष्ट्रीय सुशिक्षित बेरोजगार व स्वयंरोजगार संघटना.

पुरातत्व विभागाच्या अधिपत्याखाली असणारे  छत्रपती शिवाजी संग्रहालय हे दोन वर्ष कोविड रुग्णालय म्हणुन वापरण्यात आले होते. तसे पाहता पुरातत्त्व विभागाने काही मुदतीच्या अटीवर सदरची वास्तु जिल्हाधिकारी यांच्याकडे हस्तांतरित केली होती. या संदर्भात युवाराज्य फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महारुद्र तिकुंडे, भिमशक्ती चे कार्याध्यक्ष अरुण पवार यांनी संग्रहालयाचा वापर त्याच्या मुळ हेतुसाठीच व्हावा, अशी आग्रही भुमिका घेऊन वारंवार ही बाब शासनाच्या निदर्शनास आणून देवून वेळप्रसंगी आंदोलनेही केली. श्री. छत्रपती शिवाजी संग्रहालय हे संग्रहालय म्हणुनच वापरात यावे याबाबत महारुद्र तिकुंडे यांनी घेतलेली भुमिका अतिशय योग्य आहे.
- अजित वाघमारे
जिल्हाध्यक्ष कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ, सातारा.

शासनाने श्री छत्रपती शिवरायांच्या मराठा राजधानीत अथक प्रयत्नांनी बांधलेले श्री छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय कोरोनासारख्या आजारासाठी ताब्यात घेऊन तात्पुरते रुग्णालय चालवले. आता तथाकथित कोरोना गेल्यानंतर आजपावेतो सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी आपल्या अधिकाराचा वापर करून ते ताब्यात घेतले आहे. आज आम्ही सर्व शिवप्रेमी सातारकर महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा ठरू शकेल असं हे शिव वस्तुसंग्रहालय तातडीनं खाली करून तेथे विधिवत पूजन करून सामान्य जनतेच्या दर्शनासाठी ते उपलब्ध करून द्यावे अशी जिल्हाधिकारी महोदयांना विनंती करीत आहोत. अशा प्रकारच्या विनंत्या, आर्जवे आजपर्यंत अनेक वेळा झालेलीच आहेत. परंतु प्रशासनाने त्याची फारशी गंभीर दखल घेतलेली नाही असे दिसून येत आहे. तरी आमच्या संयमाचा आणखी अंत न बघता जिल्हाधिकारी महोदयांनी तातडीने श्री छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय चालू करावे. अशी अपेक्षा आहे. अन्यथा लोकशाही मार्गाने जे-जे शक्य होईल ते ते आम्ही करू व यामध्ये काही कायदा व्यवस्थेचा जर प्रश्न निर्माण झाला तर त्यास सर्वस्वी प्रशासन व स्वतः जिल्हाधिकारी जबाबदार असतील याची  गंभीर दखल घ्यावी.
- शैलेंद्र सावंत
अध्यक्ष, वेदांता गोशाळा सातारा.