maharashtra

आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित पगारापोटी १ कोटींचा निधी प्राप्त

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश; लवकरच आणखी १ कोटी रुपयांचा निधी मिळणार

Received Rs. 1 crore from pending salary of contract employees in health department
सातारा येथील जिल्हा रुग्णालयासह जिल्ह्यातील आरोग्य विभागात कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित पगारापोटी उपसंचालक, आरोग्य सेवा पुणे मंडळ पुणे आणि वित्त व लेखा महाराष्ट्र शासन पुणे यांच्या माध्यमातून माध्यमातून १ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

सातारा : सातारा येथील जिल्हा रुग्णालयासह जिल्ह्यातील आरोग्य विभागात कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित पगारापोटी उपसंचालक, आरोग्य सेवा पुणे मंडळ पुणे आणि वित्त व लेखा महाराष्ट्र शासन पुणे यांच्या माध्यमातून माध्यमातून १ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. गेले अनेक महिने यासाठी सुरू असलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून लवकरच आणखी १ कोटी रुपयांचा निधी प्राप्त होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. हा निधी प्राप्त झाल्यामुळे गेल्या १७ ते १८ महिन्यांपासून पगारापासून वंचित असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.
डॉ. सुभाष चव्हाण पुढे म्हणाले, सातारा जिल्ह्याच्या आरोग्य सेवेत काही वैद्यकीय अधिकारी, सिस्टर्स, सुरक्षा रक्षक कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करीत आहेत. काही वैद्यकीय अधिकाऱ्यांना प्रति महिना ७५ हजार रुपये मानधन आहे. असे जिल्ह्यात सात ते आठ वैद्यकीय अधिकारी असून त्यांचा पगार गेल्या ७ ते ८ महिन्यांपासून झाला नाही. सुरक्षा रक्षकही गेल्या दोन महिन्यांपासून पगारापासून वंचित आहेत. माण-खटाव या तालुक्यात काम करणाऱ्या आरोग्य सेवकांचा पगार गेल्या १७ ते १८  महिन्यापासून झाला नसल्यामुळे आपल्या कुटुंबाचा चरितार्थ कसा चालवावा असा प्रश्न त्यांच्यापुढे पडला होता.  कोरोना काळात योद्धाची भूमिका बजावणारे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी पगारापासून वंचित असल्यामुळे फार वेदना होत होत्या, त्यामुळे पगारापासून वंचित राहिलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पगार लवकरात लवकर मिळावे यासाठी वित्त व लेखा विभागाचे आरोग्य उपसंचालक यांच्याकडे सातत्याने निधीची मागणी करण्यात येत होती.  सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित पगारापोटी १ कोटींचा निधी प्राप्त प्राप्त झाला असून या निधीचे समान वाटप करण्यात येणार आहे. दरम्यान आणखी १ कोटी रुपयांची मागणी केली असून तो निधी लवकरच प्राप्त होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
गेले अनेक महिने पगारापासून वंचित असणाऱ्या आरोग्य सेवेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांची अवस्था अत्यंत दयनीय अशी झाली होती. घरभाडे, किराणा, दूध, विज बिल, मुलांची शिक्षणे, कुटुंबातील ज्येष्ठ नागरिकांचे आजारपण या सर्व समस्यांना त्यांना सामोरे जावे लागत होते. त्यामुळे प्रलंबित पगार केव्हा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले असतानाच प्रलंबित पगारापोटी १ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाल्याची माहिती मिळताच अनेक कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आज रंगपंचमी दिवशी आनंदोत्सव साजरा केला.