पोलिसाच्या अंगावर गाडी घातली अन् नागरिकांनी दिला चोप
पोवई नाक्यावर दोन युवकांचा प्रताप; मद्यप्राशन केल्याचे आले समोर
गुरुवारी दुपारी पोवई नाक्यावरील शिक्षक बँकेसमोर दोन युवक पोलिसाच्या अंगावर धावून गेल्याने तणाव निर्माण झाला. यावेळी संतप्त झालेल्या काही नागरिकांनी युवकांना चोप दिला. युवकांनी मद्यप्राशन केल्याचे समोर आले असून रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
सातारा : गुरुवारी दुपारी पोवई नाक्यावरील शिक्षक बँकेसमोर दोन युवक पोलिसाच्या अंगावर धावून गेल्याने तणाव निर्माण झाला. यावेळी संतप्त झालेल्या काही नागरिकांनी युवकांना चोप दिला. युवकांनी मद्यप्राशन केल्याचे समोर आले असून रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
याबाबत प्राथमिक माहिती अशी, ट्रॅफिकचे पोलिस पोवई नाका परिसरात थांबले होते. दुचाकीवरुन आलेले दोन युवक दुचाकी नीट चालवत नव्हते व इतर वाहन चालकांना आरेरावी करत होते. ही बाब क्रेनवरील पोलिस हवालदार बाळासाहेब पवार यांनी पाहिल्यानंतर त्यांनी संशयितांना थांबण्यास सांगितले. मात्र यावेळी संशयितांनी वाहन पोलिसाच्या अंगावर घातले. सुदैवाने पोलिसाला यात दुखापत झाली नाही. मात्र भर वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या या घटनेचे पडसाद उमटले.
परिसरात संशयितांनी गोंधळ घातल्याने लोक जमले. दोन्ही संशयित युवक नशेत तर्रर्र होते. पोलिसांना ते उलटसुलट बोलत असताना जमाव संतप्त झाला व युवकांना बदडले. पोवई नाक्यावर इतर ट्रॅफिक पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेवून संशयित दोघांना ताब्यात घेवून जमावाला शांत केले. जमाव गेल्यानंतर पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेवून पोलिस ठाण्यात आणले. संशयितांवर रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. दोघेजण मोळाचा ओढा व करंजे परिसरातील युवक असल्याचे समोर आले आहे.