maharashtra

असंघटीत बांधकाम कामगारांचा आक्रोश मोर्चा

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

सातारा जिल्ह्यातील असंघटीत बांधकाम कामगारांनी घरासाठी जागा, दिवाळीपूर्वी बोनस मिळावा यासह विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर गुरुवारी दुपारी आक्रोश मोर्चा काढला. यामध्ये शेकडो कामगार सहभागी झाले होते.

सातारा : सातारा जिल्ह्यातील असंघटीत बांधकाम कामगारांनी घरासाठी जागा, दिवाळीपूर्वी बोनस मिळावा यासह विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर गुरुवारी दुपारी आक्रोश मोर्चा काढला. यामध्ये शेकडो कामगार सहभागी झाले होते.

यावेळी कामगारांनी जोरदार घोषणाबाजी केली.अखिल भारतीय मजदूर कल्याण सेवा संघाच्यावतीने महा आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. मिनाक्षी पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली हा मोर्चा निघाला. पोवई नाक्यावरुन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा आला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना देण्यात आले.
या आंदोलनात योगेश पोळ, भानुदास डाईंंगडे, नंदा चोरगे, नीलेश मोरे, आदर्श खाडे, संगिता साळुंखे, राहुल खरमाटे, सदाशिव खाडे, वनीता सुर्वे, स्वाती गादेकर आदी सहभागी झाले होते.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, असंघटीत बांधकाम कामगारांचे प्रलंबित अर्ज निकाली काढून मंजूर करुन घ्यावेत, ऑनलाइन अर्जात चुकीच्या व मनमानी पध्दतीने त्रुटी दाखविण्यात आल्या आहेत. त्यामुळे अर्ज नामंजूर केले जात आहेत. नामंजूर अर्ज लवकरात लवकर मंजूर करावेत. बांधकाम कल्याणकारी मंडळाकडून पुरविले जाणाऱ्या मध्यान्ह भोजनात अत्यंत खराब अन्न पुरविले जाते. त्यामुळे ही योजना बंद करुन त्या बदल्यात कामगारांना कोरडा शिधा पुरवावा किंवा एक हजार रुपये द्यावेत. बांधकाम कल्याणकारी मंडळाकडे कोट्यवधी रुपयांचा निधी शिल्लक असून कामगारांना दिवाळीपूर्वी प्रत्येकी १० हजार बोनस देण्यात यावा, सातारा जिल्ह्यातील हजारो बेघर कामगारांना स्वत:चे घर बांधण्यासाठी शासनाने जमीन उपलब्ध करुन द्यावी. ६० वर्षांवरील कामगारांना तत्काळ पेन्शन योजना सुरू करावी, सातारा जिल्हा बांधकाम कामगार मंडळाच्या कामगार आयुक्तालयातील सर्व पदे भरुन गैरसोय टाळावी आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.