ॲड. गुणरत्न सदावर्तें यांची पोलीस कोठडी नाकारली : 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
आता पुढील मुक्काम पुन्हा आर्थर जेलमध्ये : साताऱ्यात आज जामीन अर्जावर होणार सुनावणी
ॲड. गुणरत्न सदावर्ते यांची अडचण वाढतच चालली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांची साताऱ्यातील पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने 5 वाजता त्यांना सातारा जिल्हा न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांची पोलीस कोठडी नाकारली मात्र, त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांचा पुढील मुक्काम आर्थर जेलमध्ये आहे. दरम्यान, त्यांच्या वकिलांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावर आज मंगळवारी सातारा न्यायालयात सुनावणी होणार आहे.
सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले व कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने वादग्रस्त ठरलेल्या ॲड. गुणरत्न सदावर्ते यांची अडचण वाढतच चालली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांची साताऱ्यातील पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने 5 वाजता त्यांना सातारा जिल्हा न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांची पोलीस कोठडी नाकारली मात्र, त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांचा पुढील मुक्काम आर्थर जेलमध्ये आहे. दरम्यान, त्यांच्या वकिलांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावर आज मंगळवारी सातारा न्यायालयात सुनावणी होणार आहे.
ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना सातारा पोलिसांनी चार दिवसांपूर्वी अटक केली. तेव्हापासून ते सातारा शहर पोलिसांच्या लॉकअपमध्ये आहेत. चार दिवसात त्यांच्या आवाजाचे नमुने घेऊन व घटनस्थळाचा पंचनामा केला. यासह अनेक मुद्द्यांवर चौकशी केली. काल पोलीस कोठडी संपणार असल्याने त्यांना जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. दोन्ही पक्षाने कोर्टासमोर युक्तिवाद केला. सरकार पक्षाने पुन्हा पोलिस कोठडी मागितली. मात्र न्यायालयाने बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून पोलिस कोठडी नाकारली. मात्र, त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानावर हल्ल्याप्रकरणापासून ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. मुंबईमधील पोलीस कोठडी सोडल्यानंतर त्यांना सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याप्रकरणी सातारा पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना अटक केल्यावर चार दिवसांपूर्वी त्यांना सातारा न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. या चार दिवसात पोलीस चौकशी व त्यांच्या आवाजाचे नमुने घेण्याची प्रक्रियाही सुरु होती. सोमवार दि. 18 रोजी त्यांची पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने आता सदावर्ते यांच्याबाबत पुढे काय होणार? याची उत्सुकता होती.
सोमवारी दुपारी पोलीस बंदोबस्तात ॲड. सदावर्ते यांची वैद्यकीय तपासणी केली. डॉक्टरांनी पोलीस ठाण्यात येऊनच त्यांची वैद्यकीय तपासणी केली. यानंतर त्यांची तब्येत उत्तम असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. केल्यानंतर पोलीस ठाण्याच्या कोठडीतून त्यांना सातारा जिल्हा सत्र न्यायालयात नेण्यात आले. तिथे न्यायाधिशांसमोर युक्तीवादानंतर न्यायालयाने बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून पोलीस कोठडी नाकारली.