maharashtra

दारुच्या नशेत घर पेटवल्याने एकास 3 वर्ष सक्तमजुरी व दंड


3 years hard labor and fine for burning a house under the influence of alcohol
ठाकूरकी (ता फलटण) येथील यशंवत बाबू जाधव यांचे घर दारुच्या नशेत पेटवून दिल्याने त्याच गावातील अंकुश लालासाहेब चव्हाण याला 5 वे अतिरिक्त सत्र न्यायाधिश एस.जी. नंदीमठ यांनी 3 वर्ष सक्तमजुरी व बारा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

सातारा : ठाकूरकी (ता फलटण) येथील यशंवत बाबू जाधव यांचे घर दारुच्या नशेत पेटवून दिल्याने त्याच गावातील अंकुश लालासाहेब चव्हाण याला 5 वे अतिरिक्त सत्र न्यायाधिश एस.जी. नंदीमठ यांनी 3 वर्ष सक्तमजुरी व बारा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, आरोपी अंकुश चव्हाण हा खुनाच्या गुन्ह्यामध्ये कळंबा कारागृह कोल्हापूर येथे शिक्षा भोगत होता. तो जुलै 2020 मध्ये संचित रजेवर बाहेर आला होता. या दरम्यान त्याने दि.27 जुलै 2020 रोजी दारुच्या नशेत गावात दंगा घालून यशवंत जाधव यांच्या घरी गेला होता. त्यावेळी आरोपी याने तक्रारदार यांच्याशी वाद घातला. या रागाच्या भरात आरोपी याने तक्रारदार यांचे कुडाचे घर पेटवून दिले. आग लागल्याने तक्रारदार यांच्या घरातील संसारपयोगी साहित्य जळून खाक झाले.
घडलेल्या घटनेची माहिती तक्रारदार यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल भंडारे यांनी करून सातारा जिल्हा न्यायालयात आरोपी विरोधात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी वकील महेश शिंदे यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य मानून न्यायाधिशांनी आरोपीला 3 वर्ष सक्तमजुरी व 12 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तसेच आरोपीकडून वसूल केलेला दंड हा तक्रारदार जाधव यांना भरपाई म्हणून देण्याचे आदेश देण्यात आले.
पोलीस प्रॉसिक्यूशन स्कॉडचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र यादव, शिवाजी घोरपडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक उर्मिला घार्गे, एस.एस.पाटील, हवालदार शमशुद्दीन शेख, गजानन फरांदे, रेहाना शेख, राजेंद्र कुंभार, अमित भरते यांनी सहकार्य केले.