पुसेगाव पोलिसांकडून गेल्या २० दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेचा अद्याप तपास सुरूच
पुसेगावात परप्रांतीय मजुराला सहकाऱ्यांनीच मारल्याचा संशय
गेल्या २० दिवसापासून पुसेगाव ता खटाव येथे गवंडी काम करणारा राजू चंद्रबली पटेल (वय ३२) हा परप्रांतीय मजुर १४ डिसेंबर पासून अचानक गायब झाला आहे. ती व्यक्ती हरवली का भांडणातून हत्या झाली, याबाबत अद्याप उलगडा झाला नाही, त्यामुळे पोलीस यंत्रणाही कामाला लागली आहे.
पुसेगाव : गेल्या २० दिवसापासून पुसेगाव ता खटाव येथे गवंडी काम करणारा राजू चंद्रबली पटेल (वय ३२) हा परप्रांतीय मजुर १४ डिसेंबर पासून अचानक गायब झाला आहे. ती व्यक्ती हरवली का भांडणातून हत्या झाली, याबाबत अद्याप उलगडा झाला नाही, त्यामुळे पोलीस यंत्रणाही कामाला लागली आहे. मात्र संथगतीने तपास आणि तपासात काहीही प्रगती होत नसल्याने संबधित व्यक्तीच्या नातेवाईकांनी थेट जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. राजू सोबत राहणाऱ्या सात ते आठ मजूर सहकारी आणि ठेकेदाराने त्याची हत्या केल्याच्या संशय नातेवाईकांकडून व्यक्त केला जात आहे.
याबाबत राजू यांचा पुतण्या उपेंद्रकुमार मोतीलाल पटेल(रा बैतालपूर उत्तरप्रदेश हल्ली रा पुसेगाव ता खटाव) यांनी २९ डिसेंबर रोजी पुसेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
फिर्यादी यांच्या म्हणण्यानुसार, राजू पटेल हा उत्तरप्रदेश येथील मूळचा रहिवासी असून तो पुसेगाव येथे ठेकेदार मेवालाल जवाहिर चव्हाण याच्याकडे बांधकाम मजूर म्हणून काम करत होता. तो श्री सेवगिरी सांस्कृतिक भवन शेजारील येरळा नदीकाठच्या खोलीत आपल्या सात ते आठ मजूर सहकाऱ्यांसोबत राहत होता. १४ डिसेंबरच्या दरम्यान राजू पटेल याचा ठेकेदार आणि सहकारी मजुरांसोबत किरकोळ कारणावरून वाद झाला होता. या तीव्र वादावादीनंतर ठेकेदार आणि मजूर सहकाऱ्यांनी राजू याला बेदमपणे मारहाण करून त्याच्या डोक्यात खोरे घालून घातपात केला. त्यानंतर ठेकेदारासोबत सर्वजण मजूर गायब असल्याने राजू हे गंभीर जखमी आहेत की मयत याचा शोध घेणे कठीण झाले आहे. मात्र या मारहाणीतच राजू याचा मृ्त्यू झाल्याचं त्याच्या कुटुंबीयांच म्हणणं आहे. त्यामुळे राजू हे असतील त्या अवस्थेत परत मिळावेत आणि आम्हाला न्याय मिळावा, अशी आशा कुटुंबीय व्यक्त करत आहेत.