maharashtra

आज पहिला श्रावणी सोमवार; भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, परळी वैजनाथ मंदिरांमध्ये पहाटेपासूनच भक्तांची रीघ


Today is the first Shravani Monday; Bhimashankar, Trimbakeshwar, Parli Vaijnath temples are full of devotees since dawn
बारा ज्योतिर्लिंगांपैकी हिंगोलीतील औंढा नागनाथ, बीडमधील वैद्यनाथ, छत्रपती संभाजीनगरमधील घृष्णेश्वर मंदिरात भाविकांनी पहाटेपासून गर्दी केली आहे.

भीमाशंकर मंदिरात भाविकांची पहाटेपासून गर्दी
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकर मंदिरात भाविकांनी पहाटेपासून गर्दी केलीय. मंदीराच्या गाभाऱ्यात विधीवत पुजा करुन भीमाशंकरचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले.  भीमाशंकरला महाराष्ट्राच केदारनाथ देखील म्हटले जात.

छत्रपती संभाजीनगरमधील घृष्णेश्वर मंदिर  सजले
 छत्रपती संभाजीनगरमधील घृष्णेश्वर मंदिर श्रावणी सोमवारच्या निमित्तानं सजून गेलंय. बारा ज्योतीर्लिंगांपैकी शेवटचं ज्योतिर्लिंग म्हणजे घृष्णेश्वर. त्यामुळे शिवशंभोंच्या दर्शनासाठी भाविकांचा अलोट उत्साह दिसून येतोय. पहाटे गाभाऱ्यात पूजा केल्यानंतर भाविकांसाठी मंदिर खुलं करण्यात आलं. पहाटेपासूनच भाविक बेल-फूलं वाहून तसेच  दुग्धाभिषेक करून शिवशंकराचं दर्शन घेत आहेत.

नागनाथ मंदिरात भाविकांची रिघ
बारा ज्योतिर्लिंगांपैकी आठवं ज्योतिर्लिंग म्हणजे हिंगोलीतील औंढा नागनाथ. पहाटेपासून या मंदिरात भाविकांची रिघ सुरू आहे. मध्यरात्री प्रशासकीय पूजा झाल्यानंतर मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुलं करण्यात आलं. हेमाडपंथी असलेल्या या नागनाथ मंदिरात भाविकांची कायम रिघ असते. 

शिखर शिंगणापूरमध्ये भाविकांची गर्दी 
पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त शिखर शिंगणापूरला भाविकांनी मोठी गर्दी केलीय. पहिलाच श्रावणी सोमवार असल्याने महादेवाच्या मंदीराला फुलांची सजावट करण्यात आलीय. या मंदिरात विदर्भ आणि मराठवाड्यातून मोठ्या संख्येने भाविक येत असतात. येणाऱ्या भाविकांसाठी मंदिर प्रशासनाच्या वतीने अन्नछत्र देखील राबवले जातं.  

वैद्यनाथाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

श्रावणी सोमवारच्या निमित्ताने बीडमधील वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचं मंदिर आकर्षक रोषणाईनं उजळून निघालंय. वैद्यनाथ हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असल्याने भाविकांची अपार श्रद्धा आहे. त्यामुळे दर्शनासाठी राज्यासह परराज्यातूनही भाविक येत असतात. त्यांना दर्शन घेणं सुलभ व्हावं यासाठी मंदिराच्या उत्तरेकडील पायऱ्यांवर लोखंडी बॅरिकेटस उभारण्यात आलेत.  

दर्शनासाठी राज्यच नाही तर देशातील विविध ठिकाणचे भाविक मंदिर परिसरात आले आहेत. त्यामुळे भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी मंदिर प्रशासनाने देखील व्यवस्था केलीये. तर सीसीटीव्हीद्वारे पोलिसांची करडी नजर इथे आहे. श्रावण महिन्यात दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी मंदिर परिसरात बघायला मिळते.