सातारा जिल्ह्यातून हद्दपार केले असतानाही येथील सदरबझार परिसरात असणाऱ्या लक्ष्मी टेकडी येथे आढळून आल्याने एकावर आदेशाचे उल्लंघन केल्यासह महिलेचा विनयभंग केल्याचा गुन्हा सातारा शहर पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे.
सातारा : सातारा जिल्ह्यातून हद्दपार केले असतानाही येथील सदरबझार परिसरात असणाऱ्या लक्ष्मी टेकडी येथे आढळून आल्याने एकावर आदेशाचे उल्लंघन केल्यासह महिलेचा विनयभंग केल्याचा गुन्हा सातारा शहर पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सुरज राजू माने, रा. सदरबझार, सातारा याला दि. २४ डिसेंबर २०२१ रोजी सातारा जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपर केलेले असतानाही तो दि. १८ फेब्रुवारी रोजी ५ वाजण्याच्या सुमारास सातारा येथील सदरबझार परिसरात असणाऱ्या लक्ष्मी टेकडी येथे आढळून आला. याबाबत पोलीस नाईक गणेश संजीवन ताटे यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर त्याच्यावर आदेशाचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, १७ फेब्रुवारी रोजी १ वाजण्याच्या सुमारास सातारा शहर परिसरात एक 19 वर्षीय मुलगी घरी एकटी असताना सुरज माने हा तिच्या घरी आला. त्याने तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून ती आरडाओरडा करू लागल्याने तिला शिवीगाळ दमदाटी करून तिला ढकलून तो पळून गेल्याचा गुन्हाही त्याच्यावर दाखल झाला आहे.