गिर्यारोहक प्रियांका मोहितेंना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्रदान
सातारकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा : पहिली महाराष्ट्रीयन महिला गिर्यारोहक
सातारकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी गौरवास्पद अशी कामगिरी सातारा जिल्ह्यातील गिर्यारोहक प्रियांका मंगेश मोहिते यांनी केली आहे. गिर्यारोहण या साहसी क्रीडा प्रकारात नवनवीन विक्रम करणाऱ्या गिर्यारोहक प्रियांका मंगेश मोहिते यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते तेनजिंग नॉर्गे साहस पुरस्काराने गौरविण्यात आले आहेत.
सातारा : सातारकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी गौरवास्पद अशी कामगिरी सातारा जिल्ह्यातील गिर्यारोहक प्रियांका मंगेश मोहिते यांनी केली आहे. गिर्यारोहण या साहसी क्रीडा प्रकारात नवनवीन विक्रम करणाऱ्या गिर्यारोहक प्रियांका मंगेश मोहिते यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते तेनजिंग नॉर्गे साहस पुरस्काराने गौरविण्यात आले आहेत.
नुकताच केंद्रीय युवा कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाचा 2021 वर्षांचा राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते गिर्यारोहक प्रियांका मंगेश मोहिते यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी केंद्रीय युवा कल्याण आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकुर, केंद्रीय राज्यमंत्री निसिथ प्रमाणिक तसेच वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.
सातारा जिल्ह्यातील कन्या गिर्यारोहक प्रियांका मंगेश मोहिते यांच्याबद्दल सांगायचे झाले तर, त्या गेली अकरा वर्षे गिर्यारोहक म्हणून मोहिमा करत आहेत. वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी तिने माऊंट एव्हरेस्टवर पाऊल ठेवले. तेथून प्रियांका मोहितेचा प्रवास सुरु झाला. प्रियांकाने आज अखेर गिर्यारोहणाच्या अनेक साहसी मोहिमा यशस्वी केल्या आहेत.
जगातील 14 अष्टहजारी हिमशिखरांपैकी 4 हिमशिखरांवर चढाई करुन निर्विवाद यश मिळवणारी प्रियांका ही पहिली महाराष्ट्रीयन महिला गिर्यारोहक आहे. जगातील चौथे अत्युच्च शिखर ल्होत्से (8516 मीटर), 2019 मध्ये पाचवे अत्युच्च मकालू (8463 मीटर) आणि 2021 मध्ये अत्यंत भयावह असे 10 वे अत्युच्च अन्नपूर्णा (8091 मीटर) शिखरावर प्रियांकाने यशस्वीरित्या चढाई केली आहे. या शिखरांवर चढाई करणारी ती पहिली महिला भारतीय गिर्यारोहक ठरली आहे. प्रियांका हिने केलेल्या साहसी कामगिरीबद्दल तिला राष्ट्रपतींच्या हस्ते 'तेनजिंग नोर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार' हा भारताचा सर्वोच्च साहसासाठी दिला जाणारा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.