स्वस्त धान्य दुकानदारांचे साताऱ्यामध्ये धरणे आंदोलन
सुमारे अडीचशे रेशनिंग धारकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्या
अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघ यांच्या वतीने सातारा जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदारांचे एक दिवसीय धरणे आंदोलन सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली.
सातारा : अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघ यांच्या वतीने सातारा जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदारांचे एक दिवसीय धरणे आंदोलन सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली. संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत शेटे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला ऑल इंडिया फेयर प्राईस शॉप डीलर्स फेडरेशन नवी दिल्ली यांनी पाठिंबा दिला आहे.
रेशनिंग दुकानदारांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना यावेळी निवेदन सादर करण्यात आले. स्वस्त धान्य दुकानदारांचे प्रश्न सोडवण्यामध्ये राज्य सरकार वारंवार दुर्लक्ष करत आहे. करोना सारख्या महामारी मध्ये स्वतःचा जीव धोक्यात घालून दुकानदारांनी सर्वसामान्यांना धान्य वितरण केले, मात्र बदलत्या काळाबरोबर पॉस मशीनच्या तांत्रिक अडचणी, वारंवार डाऊन होणारा सर्वर, पारंपारिक प्रशासकीय अडचणी यामुळे रेशन दुकानदारांना जीणे नकोसे झाले आहे. अलीकडेच केरोसीन व्यवसाय राज्य शासनाने संपुष्टात आणल्याने 55 हजार कुटुंबे रस्त्यावर आली आहेत. या विरोधात राज्य शासन कोणत्याही ठोस धोरण जाहीर करत नाही व रेशनिंग धान्य दुकानदारांना तुटपुंजा कमिशनवर उदरनिर्वाह करावा लागत आहे, या धोरणाच्या निषेधार्थ संघटनेच्या अडीचशे सदस्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर सुमारे दोन तास धरणे आंदोलन केले.
राज्य शासनाच्या अनिश्चित धोरणांचा निषेध करण्यात आला. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी व जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांना यावेळी निवेदन सादर करण्यात आले या आंदोलनाविषयी बोलताना श्रीकांत शेटे म्हणाले एक जानेवारी 2024 पासून राज्य व केंद्र सरकारच्या विरोधात राज्यव्यापी व देशव्यापी बंद छेडण्यात येणार आहे. 16 जानेवारी 2024 रोजी दिल्ली येथील रामलीला मैदानावरून संसद भवनावर स्वस्त धान्य दुकानदारांचा भव्य मोर्चा नेला जाणार आहे. रेशन दुकानदारांना तांत्रिक प्रणालीमध्ये सुलभता आणून त्यांना मिळणाऱ्या कमिशनमध्ये वाढ व्हावी आणि वितरण प्रणाली मध्ये सुटसुटीत पणा यावा, या विविध मागण्या दखलपात्र आहेत. मात्र त्याचा गांभीर्याने विचार होत नाही. यामुळेच रेशन दुकानदार आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याचे त्यांनी सांगितले.